ज्ञानवापी व्यास तळघरातील पूजास्थानाला धोका? हिंदू पक्षाची कोर्टात धाव, केला मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 04:58 PM2024-03-05T16:58:51+5:302024-03-05T17:03:37+5:30
Gyanvapi Case: ज्ञानवापी व्यास तळघरातील पूजास्थानासंदर्भात हिंदू पक्षाने कोर्टात एक याचिका दाखल केली आहे.
Gyanvapi Case: ज्ञानवापी परिसरात असलेल्या व्यास तळघरात हिंदूना पूजा करण्याचा अधिकार देण्याचा महत्त्वपूर्ण निकाल वाराणसी जिल्हा न्यायालयाने दिला होता. मुस्लिम पक्षकारांनी याविरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, ही याचिका फेटाळण्यात आली. यातच आता हिंदू पक्षाने ज्ञानवापी व्यास तळघरातील पूजास्थानाला धोका निर्माण होत असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
हिंदू पक्षातर्फे न्यायालयात बाजू मांडणारे वकील विष्णू शंकर जैन यांनी याबाबत बोलताना मोठा दावा केला आहे. ज्ञानवापीतील व्यास तळघराच्या वरील बाजूस नमाज अदा करण्यास आलेल्या मुस्लिम बांधवांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. या गर्दीमुळे स्लॅबवर भार येत आहे. त्यामुळे हा स्लॅब कोसळून त्या खाली असलेल्या पूजास्थानाला धोका निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे. व्यास तळघरातील पूजास्थानाचे संरक्षण व्हावे, यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती विष्णू शंकर जैन यांनी दिली.
हिंदू पक्षाने याचिकेत नेमके काय म्हटलेय?
जिल्हा न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत व्यास तळघराच्या वरील भागात मोठ्या प्रमाणावर जमण्यास मुस्लिम बांधवांना प्रतिबंध करावा, अशी मागणी केली आहे. तसेच व्यास तळघरात दुरुस्तीचे काम करण्याची परवानगी देण्यात यावी, जेणेकरून पूजास्थान संरक्षित करता येईल. व्यास तळघरातील पूजास्थानाची दुरुस्ती न्यायालयाचा आदेश असल्याशिवाय विनाअडथळा होऊ शकत नाही, असे वकील जैन यांनी म्हटले आहे.
दरम्यान, ज्ञानवापीतील व्यास तळघरात गणपती, श्रीविष्णू यांच्या एक, तर हनुमंतांच्या दोन, जोशीमठ येथील दोन प्रतिमांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. तर राम नाम लिहिलेली एक वीट स्थापन करण्यात आली आहे. एक मकर आणि एक अखंड ज्योत स्थापन करण्यात आली आहे. याशिवाय दिवसातून पाच वेळा आरतीही केली जात आहे. काशी विश्वनाथ मंदिराचे मुख्य पुजारी ओम प्रकाश मिश्रा आणि अयोध्येतील रामललाच्या अभिषेकासाठी शुभ मुहूर्त ठरवणारे गणेश्वर द्रविड यांनी व्यास तळघरात पहिली पूजा केली. वाराणसी जिल्हा न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेश यांनी पूजा करण्याची जबाबदारी काशी विश्वनाथ ट्रस्टकडे दिली आहे. व्यास तळघरात पूजा सुरू झाल्यापासून लाखो भाविकांनी याचे दर्शन घेतले आहे.