Gyanvapi Masjid: कोर्टाचा मोठा निर्णय! ज्ञानवापी मशिदीतील शिवलिंगाची 'कार्बन डेटिंग' करण्यास नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 03:44 PM2022-10-14T15:44:59+5:302022-10-14T15:45:15+5:30
Gyanvapi Masjid: वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीत सापडलेल्या शिवलिंगाची कार्बन डेटिंग करण्यास जिल्हा न्यायालयाने नकार दिला आहे.
Gyanvapi Masjid: उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणात सापडलेल्या कथित शिवलिंगाच्या कार्बन डेटिंगबाबत जिल्हा न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेश यांच्या न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. ज्ञानवापी मशिदीत सापडलेल्या कथित शिवलिंगाची कार्बन डेटिंग होणार नाही, असा निर्णय जिल्हा न्यायालयाने दिला आहे. एके विश्वेश यांनी कार्बन डेटिंगची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे. न्यायालयाचा हा निर्णय हिंदू पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
16 मे रोजी मशिदीच्या सर्वेक्षणादरम्या, वझुखान्यात एक कथित शिवलिंग सापडले होते. पण, मुस्लिम पक्षाकडून याला कारंजे म्हटले जात आहे. हे सापडल्यानंतर कार्बन डेटिंगची मागणी करण्यात आली होती. न्यायालयाने ही मागणी फेटाळत म्हटले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, कथित शिवलिंग सापडलेली जागा सुरक्षित ठेवावी. अशा स्थितीत कार्बन डेटिंगदरम्यान शिवलिंगाचे नुकसान झाले तर ते सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन ठरेल. त्यामुळे सर्वसामान्यांच्या धार्मिक भावनाही दुखावल्या जाऊ शकतात.
चार महिलांनी याचिका दाखल केली होती
वाराणसी न्यायालयाने श्रृंगार गौरी-ज्ञानवापी प्रकरण सुनावणीस योग्य मानले होते. तेव्हापासून या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. दरम्यान, हिंदू बाजूने 4 फिर्यादी महिलांनी कार्बन डेटिंगची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. ही मागणी न्यायालयाने फेटाळून लावली आहे. मात्र, शृंगार गौरीच्या पूजेच्या परवानगीसाठी दाखल केलेल्या खटल्याची सुनावणी सुरू राहणार आहे.
काय आहे ज्ञानवापी वाद?
ही मशीद औरंगजेबाने बांधली असे मानले जाते. हिंदू बाजू म्हणते की मशिदीच्या आधी त्याच ठिकाणी मंदिर होते. मुघल शासक औरंगजेबाने 1699 मध्ये काशी विश्वनाथ मंदिर पाडून मशीद बांधली होती. भगवान विश्वेश्वराचे स्वयंभू ज्योतिर्लिंग मंदिरात विराजमान होते, असा दावा केला जातो. मंदिराचे अवशेषही मशिदीत सापडतात.