Gyanvapi Masjid Case: "ज्ञानवापीत आढळलेल्या शिवलिंगवर हिरा होता, मुघलांनी तो काढून घेतला", हिंदू पक्षाचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 02:54 PM2022-05-20T14:54:02+5:302022-05-20T14:57:42+5:30
Gyanvapi Survey Case: हिंदू पक्षाचे वकील हरिशंकर जैन यांचा दावा-"मंदिर नष्ट करुन त्यावरच घुमट बसवण्यात आला. त्या घुमटाच्या खाली मंदिराचा कळस आहे.''
Gyanvapi Masjid Case:वाराणसीतीलज्ञानवापी मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी, आज हिंदू बाजूचे वकील हरिशंकर जैन यांनी एक मोठा दावा केला आहे. एका हिंदी वृत्त वाहिनीशी संवाद साधताना जैन म्हणाले की, ''वझूखान्यात सापडलेल्या शिवलिंगामध्ये पूर्वी हिरा जडलेला होता. मंदिर ताब्यात घेतल्यानंतर मुघलांनी तो हिरा बाहेर. त्यामुळेच शिवलिंगाला वरच्या बाजूस तडा गेला आहे.''
कोर्टात सादर केले पुरावे
हरिशंकर जैन पुढे म्हणाले, ''मी पुराव्यासह 274 पानी कागदपत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहेत, ज्याच्या आधारे आज सुनावणी होणार आहे. या कागदपत्रात काशी म्हणजे काय? काशीचे महत्त्व काय? याबाबत सर्व माहिती आहे. काशी हे एक धार्मिक शहर आहे, ज्याची स्थापना भगवान शिवाने केली होती. पुराणात आणि शास्त्रात त्याचा उल्लेख आहे.''
औरंगजेबाने नष्ट केले मंदिर
ते पुढे म्हणाले की, 'मी न्यायालयाला सांगितले की, औरंगजेब कसा आला आणि त्याने क्रुरपणे मंदिर उध्वस्त केले. पण तो संपूर्ण मंदिर नष्ट करू शकला नाही. आजही मशिदीच्या पश्चिमेकडील भिंतीवर मंदिराच्या कलाकृती आहेत. जुन्या मंदिरावरच घुमट बसवण्यात आला आहे. त्याच्या खाली मंदिराचा कळस आहे, माझ्याकडे त्याचा फोटो आहे,'' असेही ते म्हणाले.
सर्वेक्षण अहवालात मंदिराचा उल्लेख
न्यायालयाचे आयुक्त विशाल सिंह यांनी 12 पानी सर्वेक्षण अहवाल न्यायालयात सादर केला होता. सर्वेक्षण पथकाच्या अहवालात जे काही सांगितले आहे, ते पुरातन मंदिराचे अस्तित्व दर्शवते. विशेष सर्वेक्षण आयुक्त विशाल सिंह यांच्या अहवालात येथे शिवलिंग असून डमरू, स्वस्तिक चिन्ह, कमळाचे फूल आणि त्रिशूल चिन्हे असल्याचे सांगण्यात आले आहे.