ज्ञानवापीमध्ये शिवलिंग की कारंजा? ३० मे रोजी सत्य समोर येणार; VIDEO सार्वजनिक करणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 06:13 PM2022-05-27T18:13:24+5:302022-05-27T18:13:43+5:30
वाराणसी सत्र न्यायालयानं ज्ञानवापी मशिदीच्या सर्व्हेक्षणाचा व्हिडिओ सार्वजनिक करण्याची घोषणा केली आहे.
वाराणसी सत्र न्यायालयानं ज्ञानवापी मशिदीच्या सर्व्हेक्षणाचा व्हिडिओ सार्वजनिक करण्याची घोषणा केली आहे. मशिदीच्या आत कारंजे आहे की शिवलिंग, यामागचं सत्य ३० मे रोजी देशासमोर येईल. न्यायालय त्याच दिवशी सर्वेक्षणाचा व्हिडिओ आणि छायाचित्र सार्वजनिक करणार आहे.
ज्ञानवापी मशिदीची देखरेख करणाऱ्या अंजुमन व्यवस्था मस्जिद समितीनं सत्र न्यायालयात आणखी एक अर्ज दिला होता. आयोगानं ज्ञानवापी मशिदीत केलेल्या सर्वेक्षणाचे व्हिडिओ आणि फोटो सार्वजनिक करू नयेत, अशी मागणी या पत्रात करण्यात आली होती. यासह, हिंदू पक्षांच्या वतीनं वाराणसीच्या जिल्हा न्यायाधीशांना एक पत्र देखील पाठविण्यात आले होतं, ज्यात सर्वेक्षण अहवाल आणि न्यायालय आयुक्तांच्या ज्ञानवापी कॅम्पसचे व्हिडिओ/फोटो सार्वजनिक डोमेनमध्ये आणण्यास आणि प्रकाशित करण्यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती.
फोटो सार्वजनिक न करण्याची आयोगाची मागणी
विश्व वैदिक सनातन संघ प्रमुख श्री जितेंद्र सिंह यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आवाहन करत ज्ञानवापी छायाचित्रण किंवा व्हिडीओ प्रकाशित करू नये अशी मागणी केली होती. ही सामग्री कोणत्याही सार्वजनिक व्यासपीठावर जाहीर केली जाऊ नये. ही न्यायालयाची मालमत्ता राहिली आणि न्यायालयापुरती मर्यादित राहावी. अन्यथा देशविरोधी शक्ती याबाबत वातावरण बिघडू शकतात. जातीय सलोखा धोक्यात येऊ शकतो. देशविरोधी शक्ती सक्रिय झाल्यामुळे राष्ट्रीय सुरक्षाही धोक्यात येऊ शकते, असं मत व्यक्त केलं होतं.
शिवलिंग की कारंजा यावर वाद
दगडाच्या मध्यभागी अर्ध्या इंचापेक्षा थोडे कमी गोल छिद्र होते. त्यात सिंक टाकल्यावर ६३ सेमी खोल असल्याचं लक्षात आलं. तलावाच्या बाहेर गोलाकार करून दगडाचा आकार मोजला असता पायाचा व्यास सुमारे ४ फूट असल्याचे आढळून आले. फिर्यादी या काळ्या दगडाला शिवलिंग म्हणू लागले आहेत. तर तो कारंजा असल्याचे प्रतिवादी वकिलांनी म्हटलं आहे. सर्व्हेक्षण पथकानं त्याची संपूर्ण छायाचित्रण व व्हिडिओग्राफी केली आहे. या सर्व बाबींवर अहवालासह शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.