Gyanvapi Masjid Survey: 'ज्ञानवापी मशिदीच्या विहिरीत शिवलिंग सापडले', हिंदू पक्षाच्या वकीलाचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 11:08 AM2022-05-16T11:08:38+5:302022-05-16T11:08:45+5:30
Gyanvapi Masjid Survey: आज तिसऱ्या दिवशी ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. उद्या या सर्वेक्षणाचा अहवाल कोर्टात सादर केला जाणार आहे.
Gyanvapi Masjid Survey: ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण आज तिसऱ्या दिवशी संपले आहे. दरम्यान, हिंदू पक्षाच्या वकिलाने मोठा दावा केला आहे. हिंदू पक्षाचे वकील विष्णू जैन यांनी दावा केला आहे की, मशिदीच्या आत असलेल्या विहिरीत पाहणीदरम्यान शिवलिंग सापडले आहे. या शिवलिंगाचा ताबा घेण्यासाठी ते दिवाणी न्यायालयात जाणार आहे.
विहिरीत कॅमेरा लावून व्हिडिओग्राफी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सर्वेक्षण पथक नंदीसमोर बांधलेल्या विहिरीकडे गेले. विहिरीत जलरोधक कॅमेरा लावून व्हिडिओग्राफीही करण्यात आली आहे. यापूर्वी रविवारी झालेल्या सर्वेक्षणात तळघर व्यतिरिक्त बाजूची भिंत, नमाज स्थळ, वाजू स्थळ या ठिकाणी सर्वेक्षण करण्यात आले होते.
उद्या टीम कोर्टात अहवाल सादर करणार
वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीबाबत न्यायालयाने 12 मे रोजी मोठा निर्णय दिला होता. ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेले वकील आयुक्त अजय कुमार मिश्रा यांना हटवण्यास न्यायालयाने नकार दिला होता. मात्र, न्यायालयाचे आयुक्त अजय मिश्रा यांच्याशिवाय न्यायालयाने विशाल कुमार सिंग यांचीही न्यायालयाच्या आयुक्तपदी नियुक्ती केली होती. याशिवाय अजय सिंग यांना सहाय्यक आयुक्त करण्यात आले. न्यायालयाने सर्वेक्षणाची प्रक्रिया पूर्ण करून 17 मेपर्यंत अहवाल सादर करण्यास सांगितले होते.
RP सिंह यांना हटवले
दरम्यन, सर्वेक्षण पथक ज्ञानवापी मशिदीच्या आत जात होते तेव्हा टीमचे सदस्य आरपी सिंह यांना थांबवण्यात आले. आज तिसऱ्या दिवशीच्या सर्वेक्षणात त्यांना सहभागी होऊ दिले नाही. आरपी सिंह यांच्यावर माहिती लीक केल्याचा आरोप आहे. सिंह यांच्यावर सर्वेक्षणातील तथ्य बाहेर काढल्याचा आरोप केला जात आहे.