Gyanvapi Masjid Survey: ज्ञानवापीच्या सर्वेक्षण रिपोर्टवर सस्पेन्स, विशेष आयुक्त म्हणतात- रिपोर्ट तयार; पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 10:33 AM2022-05-17T10:33:49+5:302022-05-17T10:36:53+5:30
Gyanvapi Masjid Survey: वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग आहे का? सत्य बाहेर यायला किती वेळ लागेल? सर्वेक्षणाचा अहवाल आज न्यायालयात दाखल होणार का? या तिन्ही प्रश्नांची उत्तरे मिळण्यावर सस्पेन्स कायम आहे.
Gyanvapi Masjid Survey: वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीचा पाहणी अहवाल आज न्यायालयात सादर होणार की नाही? संपूर्ण देशाला या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायचे आहे, मात्र त्यावर सस्पेन्स कायम आहे. पाहणी अहवालाबाबत विशेष आयुक्त विशाल सिंह यांनी आज 12 वाजेपर्यंत अहवाल दाखल करणार असल्याचे सांगितले. पण, दुसरीकडे न्यायालयाचे आयुक्त अजय कुमार मिश्रा यांचे सहाय्यक वकील आयुक्त अजय सिंह यांनी आज अहवाल सादर होणार नसल्याचे सांगितले आहे.
अजय सिंह म्हणाले की, अद्याप अहवाल आलेला नाही. सर्वेक्षण अहवाल सादर करण्यासाठी वाराणसी न्यायालयाने आजची तारीख निश्चित केली होती, परंतु सर्वेक्षण अहवाल न्यायालयात सादर करण्यास विलंब होऊ शकतो. यानंतर काही वेळातच विशेष आयुक्त विशाल सिंह म्हणाले की, सर्वेक्षण अहवाल जवळपास तयार झाला आहे, थोडी भाषा आणि टायपिंगची चूक तपासावी लागेल. मला आशा आहे की आम्ही 12 वाजेपर्यंत न्यायालयात हजर होऊ शकू.
Varanasi | Survey lasted for 3 days from May 14-16. Only 50% report ready, not complete yet, which is why won't be able to produce it before the court today. We will seek 3-4 days' time from court: Assistant Court Commissioner Ajay Pratap Singh on Gyanvapi mosque report survey pic.twitter.com/mgRMP5PYL5
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) May 17, 2022
मात्र, न्यायालयाचे आयुक्त अजय कुमार मिश्रा अहवाल सादर करण्यासाठी न्यायालयाकडे आणखी वेळ मागू शकतात, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सर्वेक्षणाचे रेकॉर्डिंग 5 तासांपेक्षा जास्त झाले आहे, हे पाहता अहवाल तयार करण्यासाठी वेळ लागणार असल्याचे बोलले जात आहे. काही वेळातच हे स्पष्ट होईल की, आज पाहणी अहवाल न्यायालयात दाखल होणार की नाही?
17 मे सर्वेक्षण अहवाल सादर करण्याची अंतिम मुदत
12 मे रोजी वाराणसी न्यायालयाने 17 मे पूर्वी पुन्हा सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आणि न्यायालयाचे आयुक्त बदलण्यास नकार दिला होता. मशिदीसह संपूर्ण संकुलाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. तसेच, विशाल सिंग यांना विशेष आयुक्त बनवण्यात आले, ते संपूर्ण टीमचे नेतृत्व करत आहेत. त्यांच्यासोबत अजय प्रताप सिंग यांचाही समावेश होता.
सर्वेक्षणाचे काम तीन दिवस चालले
वाराणसी न्यायालयाच्या आदेशानंतर काल (सोमवार) तीन दिवसांत ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले. सर्वेक्षणाच्या तिसर्या दिवशी म्हणजे सोमवारी, हिंदू पक्षाने वजूखान्याजवळील विहिरीत शिवलिंग सापडल्याचा दावा केला. मशिदीच्या ज्या भागात शिवलिंग सापडल्याचा दावा केला जात आहे त्या भागाचे जुने फुटेजही समोर आले आहे.
मात्र, या चित्रांचा सर्वेक्षणाशी काहीही संबंध नाही. वजूखानामध्ये शिवलिंग मिळाल्याचा दावा समोर आल्यानंतर वाराणसी न्यायालयाने डीएम कौशल राज शर्मा यांना तात्काळ जागा सील करण्याचे आदेश दिले. तेथे कोणत्याही व्यक्तीच्या हालचालींवर बंदी घालण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. यासोबतच वुजूवरही बंदी घालण्यात आली आहे.