Gyanvapi Masjid: ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाचा निकाल देणारे न्यायाधीश चिंतेत, 'म्हणाले- कुटुंबाची सुरक्षा...'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 09:31 AM2022-05-13T09:31:30+5:302022-05-13T09:31:38+5:30
Gyanvapi Masjid: वाराणसीमधील ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाचा निकाल देणारे न्यायाधीश रवी कुमार दिवाकर यांनी आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे.
Gyanvapi Masjid Case:न्यायालयाच्या आदेशानंतर उद्यापासून वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीत सर्वेक्षण सुरू होऊ शकते. दुसरीकडे, ज्ञानवापी मशीद संकुलाचे सर्वेक्षण सुरू ठेवण्याचे आदेश देणारे दिवाणी न्यायाधीश रवी कुमार दिवाकर यांनी गुरुवारी ज्ञानवापी-श्रृंगार गौरी संकुलाचे व्हिडिओ सर्वेक्षण करण्यासाठी न्यायालयाने नियुक्त केलेल्या वकिलाची बदली करण्याची याचिका फेटाळून लावली. या निर्णयानंतर आता न्यायाधीशांनी आपल्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे.
या निर्णयानंतर त्यांच्या आजूबाजूला भीतीचे वातावरण निर्माण होत असून त्यांना आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेची खूप काळजी वाटत आहे. काल दिलेल्या आदेशानंतर न्यायमूर्ती म्हणाले की, 'सामान्य न्यायालयीन आयोगाच्या कार्यवाहीला असाधारण प्रकरण बनवून भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. आता मला माझ्या कुटुंबाची काळजी वाटते. भीती इतकी आहे की, माझे कुटुंब माझ्या सुरक्षिततेबाबत नेहमीच चिंतेत असते आणि मला त्यांच्या सुरक्षेची काळजी वाटते.'
न्यायालयाने काय आदेश दिला?
गुरुवारी वाराणसीच्या दिवाणी न्यायालयाने ज्ञानवापी मशीद आणि शृंगार गौरी प्रकरणावर निकाल दिला. न्यायालयाच्या आयुक्तांनी 17 मे रोजी अहवाल सादर करावा, असे न्यायालयाने म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, न्यायालयाने सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. 17 मे पर्यंत राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने सर्वेक्षण पूर्ण करावे, असे न्यायालयाने म्हटले आहे. सर्वेक्षणाच्या कारवाईदरम्यान दोनपैकी एक न्यायालय आयुक्त गैरहजर राहिल्यास कारवाई केली जाईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच, सर्वेक्षणाच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.