Gyanvapi Mosque Case: अकबराच्या काळापासून ज्ञानवापीचे अस्तित्व, आधीचे नाव होते...; मुस्लिम पक्षाचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 12:43 PM2022-05-19T12:43:07+5:302022-05-19T12:43:46+5:30
Gyanvapi Mosque Case: 'तुम्ही कधी शिवलिंगाच्या मध्यभागी छिद्र पाहिलं आहे का? या दगडात एक छिद्र आहे'- अब्दुल बातिन नोमानींचा दावा.
Gyanvapi Mosque Case: ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, आता न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मात्र याआधी मशिदीबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत. मशीद कमिटीचे सरचिटणीस अब्दुल बतीन नोमानी यांनी एका हिंदी वाहिनीशी केलेल्या बातचीत मध्ये मशिदीबाबत अनेक दावे केले आहेत.
मंदिराचा दावा फेटाळला
नोमानीने सांगितले की, ही आताची ज्ञानवापी मशीद अकबराच्या काळापासून अस्तित्वात आहे. याचे आधीचे नाव ज्ञानवापी नसून आलमगिरी मशीद होते. सध्याची रचना औरंगजेबाने त्याच्या काळात बांधली. पण, पाया जुनाच होता. अकबराच्या काळापासून मशीद अस्तित्वात असल्याचे पुरावे आपल्याकडे आहेत. येथे पूर्वी मंदिर होते हा दावा आम्ही नाकारतो, असे नोमानी म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, न्यायालयीन आयोगाला सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सर्वेक्षण पूर्ण होऊन 17 मे रोजी अहवाल सादर होणार होता. पण, आता अनेक प्रकारचे दावे करण्यात येत आहेत. डीएमने हे सर्व अटकळ फेटाळून लावले आणि सांगितले की जोपर्यंत न्यायालयाचा निर्णय येत नाही तोपर्यंत काहीही विचार करता येणार नाही. आम्ही तेच म्हणत आहोत.
मशिदीत शिवलिंग नसून कारंजे
शिवलिंग सापडल्याच्या दाव्याबाबत नोमानी म्हणाले की, तुम्ही कोणत्याही शिवलिंगाच्या मध्यभागी कधी छिद्र पाहिले आहे का? या दगडाच्या मध्यभागी एक छिद्र आहे. तिथे सर्व्हे चालू असताना वकीलसाहेबांनी एक लांब गज त्याच्या आत घातला होता. जर तिथे शिवलिंग असते तर आम्ही तिथे वुझू केले नसते. ते शिवलिंग नाही, कोणत्याही मशिदीत बघितले तर सगळीकडे असेच झरे आणि कारंजे पाहायला मिळतात. हे कारंजे चालताना पाहिलेले लोकही तुम्हाला भेटतील, असंही ते म्हणाले.