PM Modi Owaisi Gyanvapi Mosque : "पंतप्रधानांच्या घराखाली मशिद आहे असं म्हंटलं तर तिथेही खोदकाम करणार का?"; ओवेसींचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 07:50 PM2022-05-24T19:50:10+5:302022-05-24T19:50:42+5:30
ओवेसींच्या विधानाने नव्या वादाला तोंड
PM Modi Owaisi Gyanvapi Mosque : एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी ज्ञानवापी मशिदी संदर्भातील एका मुद्द्यावर केलेल्या एका विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासकीय निवासस्थानाच्या खाली एखादी मशीद आहे का? तसं काही असेल तर त्यांच्या निवासस्थानाच्या जागेची जमीन भाजपा खोदणार का?, असा सवाल करत ओवेसी यांनी नव्या वादाला आमंत्रण दिले. वाराणसी जिल्हा सत्र न्यायालयाकडून ज्ञानवापी मशिद प्रकरणी सुनावणी करण्यात आल्यानंतर त्यांनी हे विधान केले.
"राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवार आणि त्यांच्या निकटवर्तीय संघटनांना ताज महालाच्या खाली काय आहे हे खोदकाम करून पाहायचे आहे. मग मी असं म्हणू का की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराच्या खाली एक मशीद आहे. तसं मी म्हटलं तर त्या जागीही खोदकाम केलं जाईल का?", असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. "देशाचे शासन हे संविधानानुसार सुरू राहायला हवे. आस्थेच्या विषयांवर देश चालवला जाऊ नये. भाजपा आणि रा स्व संघ मुस्लीम लोकांचा संबंध मुघलांशी जोडण्याचा प्रयत्न करत आहे. पण आम्ही मुघलांशी जोडले गेलेले नाही", असं ओवेसींनी ठणकावले.
"भाजपा इस्लाम आणि मुस्लीमांचा द्वेष करतात"
"आसाममध्ये पूरात १८ लोक मृत्यूमुखी पडले. पण आसामचे मुख्यमंत्री मदरशांचा विषय पकडून बसले आहेत. ब्रिटीशांचे राज्य असताना मदरशातील लोक त्यांच्याविरोधात लढले होते. मदरशात विज्ञान, गणित आणि इतर विषय शिकवले जातात. पण भाजपा मात्र मुस्लीम आणि इस्लामचा द्वेष करतात. सुप्रीम कोर्टाने आदेशात असं स्पष्ट म्हटलं आहे की मुस्लीम नागरिकांना त्यांच्या धर्माचे पालन करण्याची परवानगी आहे. भाजपाला देश १९९०च्या दशकात घेऊन जायचा आहे. त्यावेळी दंगे झाले होते", असा आरोपही ओवेसींनी केला.