ज्ञानवापी मशीद : वजूखाना सील; सुरक्षेची जबाबदारी CRPF कडे सोपवली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 13:02 IST2022-05-18T13:02:18+5:302022-05-18T13:02:54+5:30
Gyanvapi Masjid : न्यायालयाच्या आदेशानंतर वाराणसी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

ज्ञानवापी मशीद : वजूखाना सील; सुरक्षेची जबाबदारी CRPF कडे सोपवली
नवी दिल्ली : वाराणसीच्या ज्ञानवापी मशीद (Gyanvapi Masjid) प्रकरणावरील वादावर मंगळवारी महत्त्वपूर्ण निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने (SC) राज्य सरकारला मशिदीच्या आवारातील, ज्या ठिकाणी हिंदू धर्मानुसार शिवलिंग सापडले आहे, त्या भागाचे संरक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, ज्ञानवापी मशिदीचा वजूखाना प्रशासनाने 9 कुलूप ठोकून सील केला आहे.
यासोबतच वजूखानाच्या सुरक्षेची जबाबदारी सीआरपीएफकडे सोपवण्यात आली आहे. सीआरपीएफचे दोन जवान 24 तास सील करण्यात आलेल्या वजूखानाचे रक्षण करतील. शिफ्टनुसार दोन्ही सीआरपीएफ जवानांची ड्युटी चोवीस तास असणार आहे. म्हणजेच प्रत्येक शिफ्टमध्ये दोन-दोन जवान तिथे तत्पर उभे राहतील, जेणेकरून शिवलिंगाच्या ठिकाणी कोणताही नुकसान होऊ नये. प्रत्येक शिफ्टमध्ये मंदिर सुरक्षेचे मंदिर सुरक्षा प्रमुख, डेप्युटी एसपी दर्जाचे मंदिर सुरक्षा अधिकारी आणि सीआरपीएफचे कमांडंट अचानक तपासणी करतील आणि शिवलिंगाची सुरक्षा पाहतील.
न्यायालयाच्या आदेशानंतर वाराणसी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, वजूखाना ज्या ठिकाणी एक छोटासा तलाव आहे, तो सील करण्यात आला आहे, कारण हा परिसर आधीच लोखंडी बॅरिकेड्स आणि जाळ्यांनी वेढलेला आहे. हे तेच ठिकाण आहे, जिथे हिंदू पक्षाने शिवलिंग सापडल्याचा दावा केला आहे. मात्र, वजूखान्यात शिवलिंग नसून कारंजे सापडल्याचे मुस्लिम पक्षाचे म्हणणे आहे.
काय म्हणाले सर्वोच्च न्यायालय?
वाराणसीच्या ज्ञानवापी मशीद प्रकरणावरील वादावर मंगळवारी महत्त्वपूर्ण निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने (SC) राज्य सरकारला मशिदीच्या आवारातील ज्या ठिकाणी हिंदू धर्मानुसार शिवलिंग सापडले आहे, त्या भागाचे संरक्षण करण्याचे निर्देश दिले. कोणत्याही मुस्लिमाला तेथे नमाज अदा करण्यापासून रोखले जाणार नाही किंवा अडवणूक केली जाणार नाही, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.पुढील सुनावणी गुरुवारी, 19 मे रोजी होईल.