Gyanwapi Masjid: शिवलिंगाच्या ठिकाणी कारंजे असेल, तर मग पाण्याचा सप्लाय दाखवा; हिंदू पक्षाचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 03:34 PM2022-05-18T15:34:04+5:302022-05-18T15:41:29+5:30
Gyanwapi Masjid: ज्ञानवापी मशिदीत सापडलेल्या शिवलिंगाखालील तळघराचे सर्वेक्षण करण्याची हिंदू पक्षाची मागणी
वाराणसी: वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग सापडल्याच्या दाव्यानंतर राजकारण तापले आहे. हिंदू पक्षाकडून मंदिराची मागणी होत आहे, तर मुस्लीम पक्षाने शिवलिंग नसून, कारंजे असल्याचे म्हटले आहे. सध्या हा परिसर कोर्टाने सील केला आहे. दरम्यान, हिंदू पक्षाचे वकील हरिशंकर जैन यांनी शिवलिंग सापडले, त्या तळघराचे सर्वेक्षण करण्याची मागणी केली आहे. तसेच, तळघरातील भिंत स्वच्छ करून त्याची व्हिडीओग्राफी केली जावी, असेही ते म्हणाले.
कारंजे असेल तर चालवून दाखवा
दरम्यान, हिंदू पक्षाचे दुसरे वकील विष्णू जैन म्हणाले की, ज्ञानवापी मशिदीच्या वझूखान्यात सापडलेल्या शिवलिंगाला कारंजे म्हटले जात आहे. हे कारंजे असेल, तर चालवून दाखवा. त्या कारंजाची पाणी पुरवठ्याची संपूर्ण व्यवस्था दाखवा, असे आव्हान त्यांनी केले. कारंजे असेल, तर सर्वेक्षणावर प्रतिवादी पक्ष का आक्षेप घेत आहे? असा प्रश्न त्यांनी केला. तसचेक, नंदीसमोरील व्यासजींच्या गाभाऱ्यापासून शिवलिंगापर्यंत हा मार्ग आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.
फिर्यादी महिलांचा न्यायालयात अर्ज
माँ शृंगार गौरी प्रकरणातील याचिकाकर्त्या सीता साहू, मंजू व्यास आणि रेखा पाठक यांच्या बाजूने ज्ञानवापीमध्ये पुन्हा एकदा सर्वेक्षणाची मागणी करण्यात आली आहे. ज्ञानवापी संकुलाच्या काही भिंती पाडण्यासह 4 मुद्यांवर अर्ज देण्यात आला आहे. मात्र, वकिलांच्या संपामुळे या प्रकरणावर अद्याप सुनावणी झालेली नाही.
सुनावणीपूर्वीच वकील संपावर गेले
वाराणसीच्या ज्ञानवापी कॅम्पस सर्व्हे प्रकरणी आज सुनावणी होण्यापूर्वीच वकील संपावर गेले. राज्य सरकारचे विशेष सचिव प्रफुल्ल कमल यांच्या वतीने राज्यातील सर्व डीएमना पत्र पाठवण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे. वकिलांचा आरोप आहे की, विशेष सचिवांनी पत्रात लिहिल्याप्रमाणे वकिलांना गोंधळात टाकण्याचा त्यांचा हेतू असल्याचे दिसते. यावेळी विशेष सचिवांचे पत्र जाळून वकिलांनी घोषणाबाजीही केली. आता विशेष सचिव प्रफुल्ल कमल यांनी राज्याच्या सर्व डीएमना आणखी एक पत्र जारी केले आहे. ज्यामध्ये त्यांनी 14 मे रोजीचे पत्र रद्द केल्याचे सांगितले आहे.