दिल्लीत जिम मालकाची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स गँगच्या रोहित गोदाराने जबाबदारी घेतली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 05:48 PM2024-09-13T17:48:47+5:302024-09-13T17:51:41+5:30
दिल्लीच्या एका उच्चभ्रू परिसरात जीमबाहेर एका अफगानी नागरिकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
Delhi Crime : राजधानी दिल्लीत सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे पुन्हा एकदा समोर आलं आहे. दक्षिण दिल्लीतील ग्रेटर कैलाश भागात गुरुवारी रात्री गोळीबार करुन एका जिम मालकाची हत्या करण्यात आली आहे. हत्या झालेली व्यक्ती ही अफगानी नागरिक झाल्याची माहिती समोर आली आहे. ग्रेटर कैलासमध्ये सुमारे ६ ते ८ गोळ्या चालवल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी जिम मालकाला रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी तपासणी करुन त्याला मृत घोषित करण्यात आले.
गुरुवारी रात्री झालेल्या गोळीबारात अफगाण वंशाच्या जिम मालकाचा मृत्यू झाला. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव नादिर शाह असून तो अफगाण वंशाचा आहे. ही घटना रात्री १०.४५ च्या सुमारास घडली. हल्लेखोरांनी जिम मालकावर सुमारे ६-८ गोळ्या झाडल्या. नादिर शाहला मॅक्स रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला. ३५ वर्षीय नादिर शाह सीआर पार्कचा रहिवासी होता आणि भागीदारीत जिम चालवत होता. त्याच्यावर दरोड्यासह चार गुन्हे दाखल आहेत.
“रात्री १०:४५ च्या सुमारास आम्हाला ग्रेटर कैलासच्या ई-ब्लॉकमध्ये गोळीबाराच्या घटनेबद्दल फोन आला. भागीदारीत जिम चालवणाऱ्या नादिर शाह नावाच्या व्यक्तीला गोळ्या घालण्यात आल्या. त्याच्यावर ७ ते ८ गोळ्या झाडण्यात आल्या. जखमी नादिर शाह याला त्याच्या मित्रांनी गंभीर अवस्थेत तातडीने रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. आम्ही आरोपींच्या शोधासाठी पाच पथके तयार करण्यात आली आहे," अशी माहिती पोलिसांनी दिली.
गँगस्टर रोहित गोदाराने सोशल मीडियावर एका कथित पोस्टद्वारे या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. याआधी गोदाराने लॉरेन्स बिश्नोई टोळीसह कॅनडातील व्हँकुव्हर बेटावर पंजाबी गायक एपी धिल्लोन यांच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेची जबाबदारीही स्वीकारली होती. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, नादिर शाह जिमच्या बाहेर उभा होता तेव्हा त्याच्यावर सुमारे १० गोळ्या चालवण्यात आल्या. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तपासासाठी घटनास्थळी पोहोचले.
"तिहारमध्ये तुरुंगात असलेल्या आमचा भाऊ समीर बाबा याच्याकडून एक मेसेज आला होता की तो (नादिर) आमच्या सर्व कामांमध्ये आमच्या शत्रूंशी हातमिळवणी करत आहे. म्हणूनच आम्ही त्याला मारले. जो कोणी माझ्या आणि माझ्या भावाच्या शत्रूंना पाठिंबा देईल त्याला त्याच परिणामांना सामोरे जावे लागेल," असे रोहित गोदाराने सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, रोहित गोदारावर ३५ हून अधिक गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर राजस्थान, दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि चंदीगडमध्ये गुन्हे दाखल आहेत. लॉरेन्स टोळीला सर्व प्रकारची शस्त्रे पुरवण्यात रोहित हा महत्त्वाचा दुवा आहे. तपास यंत्रणा आणि पंजाब पोलिसांच्या तपासात ही बाब समोर आली आहे. राजस्थानमध्ये ५ डिसेंबर २०२३ रोजी झालेल्या राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंग गोगामेडी यांच्या हत्येची जबाबदारीही रोहित गोदाराने स्वीकारली होती. रोहितवर सीकरमधील गँगस्टर राजू तहटच्या हत्येचाही आरोप आहे. सिद्धू मूसवाला हत्याकांडातही रोहित गोदाराचे नाव पुढे आले होते. २०२२ मध्ये बनावट नावाने पासपोर्ट बनवून रोहित परदेशात पळून गेला होता. सध्या गोदरा हा कॅनडात असल्याचे म्हटलं जात आहे.