एच. डी. देवेगौडा यांच्याविरोधात काँग्रेसच्या दोन नेत्यांची बंडखोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 01:45 AM2019-03-27T01:45:03+5:302019-03-27T01:45:32+5:30
कर्नाटकात काँग्रेस व जनता दल (सेक्युलर) यांचे आघाडी सरकार असले आणि लोकसभा निवडणुकांसाठी दोन पक्षांत समझोता झाला असला, तरी तुमकुर मतदारसंघातून माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्याविरोधात काँग्रेसच्या दोन नेत्यांनी अर्ज दाखल केले आहेत.
बंगळुरू : कर्नाटकात काँग्रेस व जनता दल (सेक्युलर) यांचे आघाडी सरकार असले आणि लोकसभा निवडणुकांसाठी दोन पक्षांत समझोता झाला असला, तरी तुमकुर मतदारसंघातून माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्याविरोधात काँग्रेसच्या दोन नेत्यांनी अर्ज दाखल केले आहेत. तुमकुर हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे. त्यामुळे देवेगौडा यांनी काँग्रेसतर्फे निवडणूक लढविली, तर आम्ही अर्ज मागे घेऊ , असे या नेत्यांनी जाहीर केले आहे.
जनता दल (सेक्युलर)च्या संस्थापकांविरोधातच काँग्रेसचे दोन नेते उभे राहिल्याने तुमकुरमध्ये पेच निर्माण झाला आहे. या दोघांनी अर्ज मागे घ्यावेत, असा प्रयत्न काँग्रेसकडून सुरू आहे. त्यापैकी एक तुमकुरचे काँग्रेसचे खासदार मुद्दाहणुमे गौडा आहेत, तर दुसरे काँग्रेसचे माजी आमदार के. एन. राजण्णा हे आहेत.
देवेगौडा यांचे घराणे :
देवेगौडा यांचा मुलगा कुमारस्वामी मुख्यमंत्री आहे. कुमारस्वामी यांची पहिली पत्नी अनिता या विधानसभा सदस्य आहेत. देवेगौडा यांचे दोन नातू निखिल (कुमारस्वामी यांचा मुलगा) व प्रज्वल रेवण्णा (कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाममंत्री एच. डी. रेवण्णा यांचा मुलगा) हेही आता रिंगणात आहेत. म्हणजेच देवेगौडा, कुमारस्वामी, त्यांची पत्नी आणि दुसरा मुलगा रेवण्णा व त्यांचा मुलगा असे सहा जण राजकारणात आहेत.
तुमकुर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार १0 वेळा विजयी झाले आहेत. देवेगौडा आतापर्यंत हसन मतदारसंघातून निवडून येत असत. त्यांनी आपल्या नातवासाठी ती जागा सोडली आणि जनता दलाचा बालेकिल्ला असलेला मंड्या मतदारसंघातही दुसरा नातू निवडणूक लढवत आहे. त्यामुळे ८५ वर्षांचे देवेगौडा यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाहीत, असा अंदाज होता, पण देवेगौडा यांनी तुमकुर मतदारसंघ निवडला. दोघा काँग्रेस नेत्यांनी अर्ज मागे न घेतल्यास देवेगौडा यांना अडचणीचा सामना करावा लागेल.