संघाच्या वाटेला गेल्या नसत्या, तर आज गौरी जिवंत राहिल्या असत्या- भाजपा आमदार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2017 03:29 PM2017-09-08T15:29:39+5:302017-09-08T15:33:02+5:30
गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर भाजपा आमदारांनं त्यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केलं आहे. 'गौरी लंकेश नेहमीच स्वयंसेवक संघ आणि भाजपाविरोधात गरळ ओकत होत्या. अनेकदा त्या भाजपाच्या विरोधातही लिहायच्या. स्वयंसेवकांच्या एवढ्या हत्या झाल्या त्याविरोधात त्यांनी आजपर्यंत कधीही आवाज उठवलेला ऐकिवात नाही. त्या नेहमीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांवर टीका करायच्या. त्यांनी तसं केलं नसतं तर आज त्या आपल्यात असत्या, असं वादग्रस्त वक्तव्य कर्नाटकातील भाजपा आमदारानं केलं आहे.
बंगळुरू, दि. 8 - गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर भाजपा आमदारांनं त्यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केलं आहे. 'गौरी लंकेश नेहमीच स्वयंसेवक संघ आणि भाजपाविरोधात गरळ ओकत होत्या. अनेकदा त्या भाजपाच्या विरोधातही लिहायच्या. स्वयंसेवकांच्या एवढ्या हत्या झाल्या त्याविरोधात त्यांनी आजपर्यंत कधीही आवाज उठवलेला ऐकिवात नाही. त्या नेहमीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांवर टीका करायच्या. त्यांनी तसं केलं नसतं तर आज त्या आपल्यात असत्या, असं वादग्रस्त वक्तव्य कर्नाटकातील भाजपा आमदारानं केलं आहे. कर्नाटकातील भाजपाचे आमदार डी. एन. जीवराज यांनी गौरी लंकेश यांच्या हत्येसंदर्भात खळबळजनक विधान केलं आहे. आमदार डी. एन. जीवराज यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात गोंधळ उडण्याची शक्यता आहे. भाजप युवा मोर्चाला संबोधित करताना कर्नाटकातील भाजपाचे आमदार डी. एन. जीवराज बोलत होते. जीवराज यांच्या या भाषणाचा व्हिडीओ 'इंडिया टुडे'कडे असल्यानं त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 'काँग्रेसच्या राज्यात संघाच्या स्वयंसेवकांना कशा प्रकारे जीव गमावावे लागले आहेत हे आम्ही डोळ्यांदेखत पाहिलंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एवढ्या कार्यकर्त्यांच्या हत्या होऊनसुद्धा त्या संघाच्याच विरोधात पोटतिडकीनं लिहीत होत्या. 'चड्डीवाल्यांचे अंत्यसंस्कार' हा त्यांच्या लेखात तर त्यांनी स्वयंसेवकांवर वादग्रस्त टीका केली होती. गौरी लंकेश या माझ्या बहिणीसारख्या होत्या. परंतु त्या सदोदित भाजपा आणि संघाविरोधात चुकीच्या माहितीच्या आधारवर लेख लिहित होत्या. त्यांच्या लिखाणाची भाषाशैली न पटणारी होती. त्यांनी स्वयंसेवकांबाबत असं काही तरी लिहिलं नसतं तर त्या आज जिवंत राहिल्या असत्या,' असं जीवराज यांनी म्हटलं आहे.
जीवराज यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसनंही त्यांच्यावर निशाणा साधला आहे. एका आमदारानं अशा आशयाचं विधान करणं चुकीचं आहे. त्यांना यातून काय सुचवायचं आहे?,' असा प्रश्न कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी उपस्थित केला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी श्रृंगेरी येथे या प्रकरणी जीवराज यांच्याविरोधात तक्रार नोंदवली आहे. परंतु जीवराज यांनी आपल्या विधानाचा विपर्यास केल्याचा आरोप केला आहे.