ISIS च्या संपर्कात होता हादियाचा पती, राष्ट्रीय तपास यंत्रणेची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2017 09:15 AM2017-12-04T09:15:38+5:302017-12-04T11:38:20+5:30
अखिला अशोकन उर्फ हादियाचा पती शफीन जहान लग्नाच्या एक महिना आधी एका फेसबुक ग्रुप आणि प्रसिद्ध मेसेजिंग अॅपच्या माध्यमातून दहशतवादी संघटना इसिसच्या संपर्कात होता असा दावा राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) केला आहे.
नवी दिल्ली - अखिला अशोकन उर्फ हादियाचा पती शफीन जहान लग्नाच्या एक महिना आधी एका फेसबुक ग्रुप आणि प्रसिद्ध मेसेजिंग अॅपच्या माध्यमातून दहशतवादी संघटना इसिसच्या संपर्कात होता असा दावा राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) केला आहे. या फेसबुक ग्रुपमध्ये पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडियाचा (पीएफआय) राजकीय पक्ष एसडीपीआयचे काही सदस्यही होते. यासोबत उमर अल-हिंदी प्रकरणात अटक करण्यात आलेले इसिसचे दहशतवादी मनसीद आणि साफवानदेखील या ग्रुपमध्ये होते अशी माहिती एनआयएने दिली आहे.
मनसीद आणि साफवान यांना गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात उमर अल-हिंदी प्रकरणी एनआयएने अटक केली होती. त्यांच्यावर आरोप आहे की, इसिसपासून प्रभावित त्यांनी दक्षिण भारतातील उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, पोलीस अधिकारी आणि राजकीय नेत्यांवर हल्ला करण्याचा कट आखला होता.
एनआयएचा दावा आहे की, मनसीद आणि एसडीपीआयच्या त्याच्या साथीदारांनी (ज्यांच्यात शफीनचा मित्र मुनीर सामील आहे) हादियाचा संपर्क शफीनशी करुन दिला होता. याआधी दावा करण्यात आला होता की, हादिया आणि शफीनची भेट मॅट्रिमोनिअल वेबसाईट waytonikah.com च्या माध्यमातून झाली होती. एनआयएच्या सुत्रांनुसार, मनसीद पीएफआयच्या माध्यमातून सैनबाच्या संपर्कात होता. सैनबालाच न्यायालयाने हादियाच्या लग्नावेळी गार्डियन म्हणून नेमलं होतं.
एनआयएच्या तपासात समोर आलं आहे की, मनसीद आणि साफवान शफीनच्या संपर्कात होते. शफीन कॉलेजच्या दिवसांपासूनच एसडीपीआयच्या विद्यार्थी संघटनेच्या जिल्हा समितीचा सदस्य आणि सक्रीय कार्यकर्ता होता. हे सर्व लोक सोशल मीडिया अॅप आणि फेसबुक ग्रुप 'थनल'च्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते.
अखिला अशोकन उर्फ हादियाने धर्मपरिवर्तन करत शफीन जहानशी निकाह केला होता. यानंतर हादियाच्या वडिलांनी केरळ उच्च न्यायालयात धाव घेत लग्न रद्द करण्याची मागणी केली होती. याचिकेच हादियाचं जबरदस्तीने धर्मपरिवर्तन करण्यात आलं असून, शफीनचे इसिसशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता. केरळ उच्च न्यायालयाने कलम 226 अंतर्गत विवाह रद्द केला होता आणि हादियाला वडिलांकडे सोपवण्याचा निर्णय दिला होता. यानंतर शफीनने केरळ उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. उच्च न्यायालयाच्या निकालावरच सर्वोच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच वडील मुलीच्या व्यक्तिगत आयुष्यात ढवळाढवळ करू शकत नाहीत, असे म्हटले होते.
सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना हादियाला तमिळनाडूत वैद्यकीय शिक्षणासाठी परत पाठविण्याच्या आदेश दिला. तिच्या वडिलांनी निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र, ‘आमच्या कुटुंबात कोणाही दहशतवाद्याला स्थान नाही,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.