हाफिज सईदला ठरवले पाकिस्ताननेच दहशतवादी
By admin | Published: April 22, 2017 02:04 AM2017-04-22T02:04:13+5:302017-04-22T02:04:13+5:30
मुंबईवर २00८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात-उद-दावा या संघटनेचा प्रमुख हाफिज सईद हा दहशतवादी असल्याचे स्वत: पाकिस्ताननेच मान्य केले आहे.
नवी दिल्ली : मुंबईवर २00८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात-उद-दावा या संघटनेचा प्रमुख हाफिज सईद हा दहशतवादी असल्याचे स्वत: पाकिस्ताननेच मान्य केले आहे.
पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने लाहोर उच्च न्यायालयामध्ये यासंबंधीचे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. हाफिजचा दहशतवाद आणि दहशवादी कारवायांशी संबंध असल्याचे पाकच्या गृह मंत्रालयाने या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.
हाफिज ३0 जानेवारीपासून लाहोर येथे नजरकैदेत आहे. हे अवैध असल्याची याचिका तो प्रमुख असलेल्या जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेने न्यायालयात केली आहे. त्यावर न्यायालयाने पाकिस्तान सरकारला भूमिका मांडायला सांगितले होते. त्यावर पाक सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटले की, हाफिजने अशांतता पसरवल्याचे पुरेस पुरावे उपलब्ध आहेत. एवढेच नव्हे, तर त्याच्याविरोधात दहशतवादविरोधी कायद्याअंतर्गतही कारवाई करण्यात आली आहे. मध्यंतरी पाकिस्तानने त्या देशातील अनेकांची सुरक्षा व्यवस्था कमी केली होती. त्यात हाफिजचाही समावेश होता. सुरक्षा कमी केल्यावर त्याला लगेचच नजरकैदेत ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला. सुरक्षित ठेवण्यासाठीच त्याला नजरकैदेत ठेवल्याची टीकाही अनेकांनी पाक सरकारवर केली होती. अमेरिकेने हाफिजचा मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांच्या यादीत समावेश केला आहे. शिवाय त्याच्या अटकेसाठी मदत करणाऱ्या व्यक्तीला एक कोटी
डॉलरचे बक्षीस देण्याचेही जाहीर केलेले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
अमेरिकेचा दबाव?
सात मुस्लीमबहुल राष्ट्रांतील नागरिकांना अमेरिकेने प्रवेशबंदी करण्याचा निर्णय घेतला असून, पाकिस्तानी नागरिकांवरही अमेरिका असेच निर्बंध घालेल, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पाकिस्तानने हाफिजला दहशतवादी घोषित करण्याचा निर्णय घेतला असावा, असे बोलले जाते.