Bhima Koregaon Violence: ... तर हिंदूच्या घरात हाफिज सईद निर्माण होतील, प्रकाश आंबेडकरांचे वादग्रस्त विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2018 12:19 PM2018-01-06T12:19:51+5:302018-01-06T12:29:49+5:30
भीमा-कोरेगाव प्रकरणानंतर महाराष्ट्र बंदची हाक देणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केलं आहे. महाराष्ट्र सरकारने जर या प्रकरणातील दोषींवर कारवाई केली नाही तर हिंदूच्या घरात हाफिज सईद निर्माण होतील, असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं आहे.
भोपाळ - भीमा-कोरेगाव प्रकरणानंतर महाराष्ट्र बंदची हाक देणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केलं आहे. महाराष्ट्र सरकारने जर या प्रकरणातील दोषींवर कारवाई केली नाही तर हिंदूच्या घरात हाफिज सईद निर्माण होतील, असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं आहे. भाजपाविरोधात विरोधकांकडून ‘लाठी रॅली’चं आयोजन करण्यात आलं होतं, या सभेला आंबेडकरांनाही बोलावण्यात आलं होतं. त्यांच्याव्यतिरिक्त माजी खासदार शरद यादवही या सभेत सहभागी झाले होते.
मध्य प्रदेशातील भोपाळ येथे महात्मा फुले परिषदेतर्फे माजी खासदार सुखलाल कुशवाह यांच्या 52व्या वाढदिवसाचे औचित्य साधत भाजपाविरोधात लाठी रॅली आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलताना आंबेडकरांनी आरोप केला की, 'महाराष्ट्र सरकार दोषींवर कारवाई करण्याऐवजी पीडित व्यक्तींनाच त्रास देत आहे. हे सगळं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशाऱ्यावरून सुरू असल्याचाही आरोप त्यांनी केला. जर सरकारने दोषींवर कारवाई केली नाही तर हिंदूंच्या घरातही हाफिज सईद जन्माला येतील, असं विधान त्यांनी या सभेत केलं. समाजवादी नेते शरद यादव यांनी देशातील मागासवर्गीय, दलित बांधव आणि आदिवासींनी सरकारविरोधात एकत्र आले पाहिजे, असे आवाहन केले.
जर सरकारनेच या प्रकरणातील दोषींना मदत करायला सुरुवात केली तर मग त्यांच्यावर अंकुश ठेवणार तरी कोण ? देशातील अवस्था बिकट झाली असून ती दिवसेंदिवस आणखी बिकट होत जाईल, अशी भीतीही यादव यांनी व्यक्त केली.