हाजी अली दर्ग्यातील महिला प्रवेश बंदी कायम
By Admin | Published: October 18, 2016 11:16 AM2016-10-18T11:16:02+5:302016-10-18T11:19:59+5:30
हाजी अली दर्ग्यातील महिला प्रवेश बंदी रद्द करण्यासंदर्भातील मुंबई हायकोर्टाच्या आदेशावरील स्थगितीला सुप्रीम कोर्टाने 24 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 18 - हाजी अली दर्ग्यातील महिला प्रवेश पुन्हा लांबवणीवर पडला आहे. दर्ग्यातील महिला प्रवेश बंदी रद्द करण्यासंदर्भातील मुंबई हायकोर्टाच्या आदेशावरील स्थगितीला सुप्रीम कोर्टाने 24 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. सोमवारी याप्रकरणाची सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे 'पुढील सुनावणी होईपर्यंत स्थगितीची मुदत वाढवण्यात यावी', अशी विनंती हाजी अली दर्गा ट्रस्टचे वकील गोपाल सुब्रमण्यम यांनी सरन्यायाधीश टी.एस. ठाकूर, आणि ए.एम खानविलकर यांच्या खंडपीठाला केली आहे. सुब्रमण्यम यांची विनंती सुप्रीम कोर्टाने मान्य देखील केली.
आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 24 ऑक्टोबर रोजी होणार आहे. तोपर्यंत हाजी अली दर्ग्यातील महिला प्रवेश बंदी कायम असणार आहे. या आधी झालेल्या सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने हाजी अली ट्रस्टला पुरोगामी भूमिका मांडण्यासाठी सांगितले होते. त्यानुसार 'ट्रस्ट महिलांना दर्ग्यामध्ये प्रवेश देण्यावर रिती आणि कार्यपद्धतीच्या योजनांची सकारात्मक आखणी करत आहे', असे वकील सुब्रमण्यम यांनी सांगितले आहे.
आणखी बातम्या
विशेष म्हणजे, हाजी अली दर्ग्यामध्ये महिलांना प्रवेश देऊन मुंबई हायकोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला होता. मात्र हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात ट्रस्टने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. ज्यावर सुनावणी प्रक्रिया सुरू आहे. सध्या हायकोर्टाच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या स्थगितीला 24 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.