नेत्यांमागे 'हाजी हाजी' करणे पक्षाला घातक - काँग्रेस नेते
By admin | Published: March 16, 2017 12:11 PM2017-03-16T12:11:52+5:302017-03-16T12:18:45+5:30
उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड या दोन राज्यात झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16 - उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड या दोन राज्यात झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. पक्षामध्ये नेत्यांची हाजीहाजी करण्याची जी संस्कृती सुरु आहे त्यामुळे पक्षाला दारुण पराभव स्वीकारावा लागल्याचे काँग्रेसच्या दोन माजी केंद्रीय मंत्र्यांनी म्हटले आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याभोवती नेत्यांचा जो गोतावळा असतो त्यातून ते बाहेर पडले तरच, त्यांना योग्य मार्ग सापडेल असे माजी पंचायती राज मंत्री किशोर चंद्र देव यांनी सांगितले.
मात्री केंद्रीय कायदा मंत्री अश्विनी कुमार म्हणाले की, पक्षाने ज्या चुका केल्या आहेत त्या मान्य कराव्या आणि त्यातून योग्य तो बोध घ्यावा. काँग्रेसला ऑटो इम्युन आजार झाला आहे. या आजारात आपलच शरीर आपल्या विरोधात काम करत तसचं काँग्रेसच झाल आहे. काँग्रेसमध्ये प्रत्येकाने पुन्हा पक्षसंघटना बांधण्यासाठी प्रयत्न करावा असे मत मुंबईच्या माजी काँग्रेस खासदार प्रिया दत्त यांनी व्यक्त केले.
काँग्रेस मोठया प्रमाणावर ठराविक नेत्यांवर अवलंबून आहे. पण त्यांच्यावर कोणतीही जबाबदारी निश्चित होत नाही. या नेत्यांच्या व्यक्तीगत आवड आणि न आवडण्याची किंमत पक्षाला चुकवावी लागते. ते पक्षात महत्वाच्या पदांवर आहेत. या नेत्यांमध्ये संगीत खुर्ची चालते. त्यांच्यावर एका राज्य झाले कि, दुस-या राज्याची जबाबदारी सोपवण्यात येते. या नेत्यांकडे जी राज्य दिली तिथे काँग्रेसचा पराभव झाला आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना सुद्धा हे माहित आहे असे काँग्रेस नेते किशोर चंद्र देव म्हणाले. राहुल गांधी यांच्या पलीकडे आता पक्षाने पाहण्याची गरज आहे का ? या प्रश्नावर अश्विनी कुमार म्हणाले की, राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेससमोर आज मोठे आव्हान असून, सुधारणेसाठी जे आवश्यक आहे त्याचा विचार करावा.