रस्त्यांवरील अपघातात हकनाक माणसे मरतात, त्याची आहेत ८ कारणे; जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 08:57 AM2022-01-13T08:57:36+5:302022-01-13T08:57:42+5:30
आपल्याकडे वाहतूक या विषयाबाबत पाहिजे तेवढी जागरूकता नाही.
भारतात नैसर्गिक मृत्यूनंतर सर्वांत जास्त मृत्यू हे रस्ते अपघातात होतात, तरीही वाहनचालक वाहतूक नियमांचे पालन करण्यास टाळाटाळ का करीत असावेत?
- १. आपल्याकडे वाहतूक या विषयाबाबत पाहिजे तेवढी जागरूकता नाही.
- २. वाहतूक मंत्रालय नियम करून मोकळे होते आणि त्याची अंमलबजावणी करण्याचे काम आरटीओ, वाहतूक पोलीस, महामार्ग पोलीस इ. यंत्रणांवर असते. ते एखादा अपघात झाल्यानंतरच ॲक्शन मोडमध्ये येतात.
- ३. वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करून वाहने चालवण्यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर पुरेसे नसते. पुरेसे रुंद, खड्डेविरहित रस्ते, डिव्हायडर, फुटपाथ, सिग्नल, साइन बोर्ड इ. सुविधा अद्ययावत नसतात.
- ४. भारतीय लोकांचे वाइट टाइम मॅनेजमेंट! ज्या ठिकाणी जायला १५ मिनिटे लागतात तिथे ५ मिनिटे एक्स्ट्रा राखीव ठेवून निघाले पाहिजे; पण बहुतेक लोक ५ मिनिटे उशिराच निघतात. म्हणजे पोहोचायला १५ मिनिटे लागत असतील तर हे लोक १० मिनिटे बाकी असताना निघतात. मग वेळेवर पोहोचण्यासाठी नियम मोडण्याशिवाय पर्याय नसतो.
- ५. बेजबाबदार आणि कायदा न जुमानणारे लोक जेव्हा वाहतुकीचे नियम मोडतात तेव्हा ते नियम पाळणार्या लोकांच्या मानसिकतेवर नकारात्मक परिणाम होतो. त्यांच्या मनातील कायद्याविषयीचा आदर आपसूकच कमी होतो.
- ६. बऱ्याच लोकांना वाहतुकीचे सगळे नियम माहीतच नसतात, कारण पैसे भरून वाहन चालक परवाना सहज मिळविता येऊ शकतो.
- ७. रस्त्यावर एकाच वेळी ताशी ५ किमी वेगाने चालणाऱ्या बैलगाडीपासून ते थेट ताशी २०० किमी वेगाने धावणाऱ्या गाड्यांचा समावेश असतो. त्या प्रत्येकासाठी वेगळी लेन करणे शक्य नाही. त्यासाठी परिस्थितीनुसार वेग नियंत्रित ठेवणे इतकेच आपल्या हातात आहे.
- ८. अवजड वाहनांच्या चालकांना पुरेशी विश्रांती न मिळणे, त्यांची व्यसनाधीनता! हे चालक अतिशय विपरीत परिस्थितीत, वेगवेगळ्या हवामानात रात्रंदिवस वाहने चालवीत असतात. महामार्गावर ठराविक अंतरावर चालक सुविधा केंद्र निर्माण करणे आवश्यक आहे.
- पंजाबराव देशमुख, औरंगाबाद