HAL Helicopter: वर्षाला ९०! आशियातील सर्वात मोठी हेलिकॉप्टर कंपनी तयार; मोदी सोमवारी देशाला समर्पित करणार...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 05:39 PM2023-02-04T17:39:08+5:302023-02-04T17:39:49+5:30
कर्नाटकच्या तुमकुरुमध्ये हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) चा कारखाना तयार झाला आहे.
देशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. आशियातील सर्वात मोठी हेलिकॉप्टर निर्माण करणारी फॅक्टरी तयार झाली असून सोमवारी ती देशाच्या सेवेत सोपविली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी या हेलिकॉप्टर फॅक्टरीचे उद्घाटन करणार आहेत.
कर्नाटकच्या तुमकुरुमध्ये हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) चा कारखाना तयार झाला आहे. संरक्षण मंत्रालयाने याची माहिती दिली आहे. हा कारखाना देशाच्या सर्व हेलिकॉप्टरच्या गरजा पूर्ण करणार आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे. ग्रीनफिल्ड हेलिकॉप्टर कारखाना, 615 एकरांवर पसरलेला आहे. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि संरक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. 2016 मध्ये पीएम मोदींनी या कारखान्याची पायाभरणी केली होती.
संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, सुरुवातीच्या काळात कारखाना वर्षाला सुमारे 30 हेलिकॉप्टर तयार करेल. नंतर टप्प्याटप्प्याने प्रति वर्ष ६० आणि नंतर ९० हेलिक़ॉप्टर तयार करण्यात येतील. ग्रीनफिल्ड हेलिकॉप्टर फॅक्टरी ही आशियातील सर्वात मोठी हेलिकॉप्टर उत्पादन करणारी असेल. सुरुवातीला लाइट युटिलिटी हेलिकॉप्टर (LUH) तयार करेल.
लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (LCH) आणि इंडियन मल्टीरोल हेलिकॉप्टर (IMRH) तसेच LCH, LUH, सिव्हिल ALH आणि IMRH च्या दुरुस्तीसाठी कारखाना भविष्यात विस्तारित केला जाऊ शकतो. यामुळे भविष्यात भारताला हेलिक़ॉप्टरचा मोठा निर्यातदारही होता येणार आहे.