‘सारस’चे सुधारित विमान २०२४ मध्ये झेपावणार; आत्मनिर्भर भारताचे उत्कृष्ट उदाहरण!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 09:57 AM2022-02-28T09:57:56+5:302022-02-28T09:58:56+5:30

कानपूरमध्ये २०२६ पासून बनणार पहिले भारतीय नागरी विमान

hal improved saras aircraft will take off in 2024 | ‘सारस’चे सुधारित विमान २०२४ मध्ये झेपावणार; आत्मनिर्भर भारताचे उत्कृष्ट उदाहरण!

‘सारस’चे सुधारित विमान २०२४ मध्ये झेपावणार; आत्मनिर्भर भारताचे उत्कृष्ट उदाहरण!

Next

स्नेहलता श्रीवास्तव, लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : भारतातील पहिल्या १९ आसनी नागरी विमानाची सुधारित आवृत्ती असलेले ‘सारस एमके-२’ २०२४ साली पहिले उड्डाण करील. ‘एफएआर-२३’ वायुयोग्यता मानकांच्या आधारे २०२५ पर्यंत लष्करी, तसेच नागरी वापरासाठी प्रमाणित करण्यात येईल. २०२६ मध्ये ‘एचएएल’चे (हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड) कानपूर युनिट विमानाचे उत्पादन सुरू करील, अशी माहिती ‘सीएसआयआर-एनएएल’चे (काउन्सिल ऑफ सायन्टिफिक अँड इंडस्ट्रिअल रिसर्च-नॅशनल एअरोनॉटिकल लेबोरेटरी) संचालक जितेंद्र जाधव यांनी दिली. ‘व्हीएनआयटी’त विज्ञान भारतीतर्फे आयोजित ‘मेकिंग ऑफ सारस’ या विषयावर ऑनलाइन चर्चेनंतर त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.

हे विमान बहुउद्देशीय असून, ते ३० हजार फूट उंचीपर्यंत उड्डाण करू शकते. प्रवासी, मालवाहू, व्हीआयपी वाहतूक व रुग्णवाहिका अशा चार वेगवेगळ्या उद्देशांसाठी याचे प्रकार उपलब्ध असतील. याशिवाय हे विमान अपघातग्रस्तांना बाहेर काढण्यासाठीदेखील वापरले जाऊ शकते. याचे सर्वांत मोठे प्राधान्य हे पायलट ट्रेनर विमान म्हणून वापरणे असेल, असे त्यांनी सांगितले.

‘सारस’ प्रकल्प हा भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारतचे उत्कृष्ट उदाहरण आहे. हे विमान वजनाने हलके असून, केंद्रीकृत देखभाल संगणक, उच्च कार्यक्षमतेचा एकत्रित उड्डाण नियंत्रण संगणक यांनी बनलेले आहे. ६ मार्च २००९ रोजी बंगळुरूपासून बिदाडीजवळ सुमारे ३० किमी अंतरावर असलेल्या ‘सारस’च्या दुसऱ्या प्रोटोटाइपदरम्यान भारतीय हवाई दलाचे दोन पायलट आणि एका उड्डाण चाचणी अभियंत्याचा मृत्यू झाला होता व त्यानंतर केंद्र सरकारने प्रकल्पासाठी निधी देण्याची योजना रद्द केली होती; पण २०१६ मध्ये मध्ये ‘एनएएल’ने ही योजना पुनरुज्जीवित केली. २०१९ मध्ये भारत सरकारने या प्रकल्पासाठी पुन्हा ५०० कोटी रुपयांचा निधी विमानाच्या सुधारित आवृत्तीसाठी दिला.

‘सारस एमके-२’चे फायदे

- परवडणाऱ्या किमतीत उच्च कार्यक्षमता
- उडान योजनेंतर्गत दुर्गम आणि ग्रामीण भागात हवाई संपर्क
- परकीय चलन बचत

‘सारस एमके-२’ची वैशिष्ट्ये

-  गरम प्रदेश आणि उच्च उंचीच्या हवाई क्षेत्रांवरून ऑपरेशन
- अर्धवट तयार धावपट्टीवरून उड्डाणाची क्षमता
- शॉर्ट टेक ऑफ आणि लँडिंग
- कमी ऑपरेशन आणि संपादन खर्च (१५ ते २० टक्के कमी)
- ऑटो पायलट आणि एव्हीओनिक्स
- प्रेशराइज्ड केबिनसह ग्लास कॉकपिट
- लांब ‘रेंज’ आणि उच्च सहनशक्ती
- ब्लॉक इंधनाचा कमी वापर

Web Title: hal improved saras aircraft will take off in 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.