मोदींच्या सभांमध्ये निम्मी कपात
By Admin | Published: October 15, 2015 11:39 PM2015-10-15T23:39:12+5:302015-10-15T23:39:12+5:30
बिहार विधानसभा निवडणुकींमध्ये जास्तच गाजावाजा होत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभांचा अतिरेक विपरीत परिणाम करणारा ठरू शकतो याची जाणीव झाल्याने भाजपश्रेष्ठींनी
हरीश गुप्ता, नवी दिल्ली
बिहार विधानसभा निवडणुकींमध्ये जास्तच गाजावाजा होत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभांचा अतिरेक विपरीत परिणाम करणारा ठरू शकतो याची जाणीव झाल्याने भाजपश्रेष्ठींनी रॅलींची संख्या ४० वरून २० पर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रारंभी मोदी ५ टप्प्यांत १२ ते १४ रॅलींना संबोधित करणार होते, मात्र तेच एकमेव स्टार प्रचारक असल्यामुळे रॅलींचा आकडा फुगत ४० वर गेला.
काट्याची लढत आणि भाजपच्या प्रतिष्ठेचा मुद्दा पाहता प्रचार चमूने कोणतीही कसर सोडायची नाही असे ठरवत प्रत्येक टप्प्यात मोदींच्या सहा ते सात रॅलींचा धडाका लावण्याचा निर्णय घेतला होता. १२ आॅक्टोबर रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान संपताच पंतप्रधानांच्या सभा अतीच झाल्याचा प्रतिसाद मिळाला. आता त्यांनी उर्वरित टप्प्यात २ ते ३ पेक्षा जास्त प्रचारसभा घेऊ नये असा निर्णय झाल्याचे उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले.
>> प्रत्येक मेगारॅलीसाठी गर्दी जमविण्याऐवजी कार्यकर्त्यांना दारोदार प्रचाराला अधिक वेळ देता यावा हेही अन्य कारण समोर आले आहे. भाजपने ४० प्रचारकांची यादी जारी केली असली तरी गृहमंत्री राजनाथसिंग आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याखेरीज कुणीही सभा घेतलेल्या नाहीत. शॉटगन शत्रुघ्न सिन्हा, लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्यासारखे नेते फिरकलेही नाहीत.
मुख्यमंत्री मागासवर्गीय
भाजपने बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करण्याचे टाळले असताना सुशीलकुमार मोदी, नंदकिशोर यादव यांची नावे चर्चेत आली आहेत. केंद्रीय राज्यमंत्री गिरिराजसिंग यांनी मात्र मुख्यमंत्री मागासवर्गीय राहणार हे घोषित केले आहे. भाजपचे प्रवक्ते शहनवाज हुसेन यांनी पत्रपरिषदेत बोलताना भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. प्रेमकुमार यांचे नाव समोर आणले. दुसरीकडे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी राजेंद्रसिंग आणि रामेश्वर चौरासिया यांची प्रशंसा करीत तर्कवितर्कांना वाव दिला आहे.