सुप्रीम कोर्टात निम्मे दिवस सुटीचे!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 06:10 AM2020-01-07T06:10:35+5:302020-01-07T06:10:46+5:30
प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांचा डोंगर वाढत आहे व तो कमी करण्यासाठी तातडीने पावले उचलायला हवीत असे सर्वजण म्हणत असतानाच देशाचे सर्वोच्च न्यायालय मात्र या वर्षी ३६५पैकी फक्त १९० दिवस काम करणार आहे आणि बाकीचे १७५ दिवस तेथे सुटी असणार आहे.
नवी दिल्ली : प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांचा डोंगर वाढत आहे व तो कमी करण्यासाठी तातडीने पावले उचलायला हवीत असे सर्वजण म्हणत असतानाच देशाचे सर्वोच्च न्यायालय मात्र या वर्षी ३६५पैकी फक्त १९० दिवस काम करणार आहे आणि बाकीचे १७५ दिवस तेथे सुटी असणार आहे. म्हणजेच सर्वोच्च न्यायालयात महिन्याला सरासरी जेमतेम १६ दिवस कामकाज होणार आहे.
विविध उच्च न्यायालयांचा विचार केला तर तेथेही दर महिन्याला सरासरी १६ दिवस काम होणार आहे. मुंबई, कोलकाता, गुवाहाटी व मणिपूर यासारखी उच्च न्यायालये यावर्षी २१० दिवस काम करतील.
सिक्किम उच्च न्यायालयात मात्र कामाच्या दिवसांहून (१७४) सुट्ट्यांचे दिवस अधिक आहेत. हे उच्च न्यायालय महिन्याला सरासरी फक्त १५ दिवस काम करेल.
सर्वोच्च न्यायालयास प्रत्येक शनिवार आणि रविवारच्या सुट्टीखेरीज ४५ दिवस उन्हाळी, एक आठवडा होळी व दोन आठवड्यांचे हिवाळी ‘व्हेकेशन’ असते. विविध उच्च न्यायालयांमध्येही उन्हाळी आणि दिवाळीखेरीज स्थानिक सणांनुसार ‘व्हेकेशन’ असतात.
>व्हॅकेशन आवश्यकच : न्यायाधीशांना वर्षातून दोन-तीन वेळा प्रदीर्घ ‘व्हॅकेशन’ सुरू ठेवण्याचे समर्थन करणाराही मोठा वर्ग आहे. त्यांचे म्हणणे असे की, न्यायाधीश न्यायालयात दिवसाला पाच-सहातास प्रकरणांची सुनावणी घेतात. सुनावणीआधी प्रकरणे अभ्यासण्यासाठीही त्यांना घरी बराच वेळ द्यावा लागतो. त्यांचे काम प्रामुख्याने बौद्धिक असल्याने त्याचा शिणवटा घलविण्यासाठी काही दिवस ‘व्हॅकेशन’ गरजेचे आहे.