बहिरममध्ये शेवटच्या रविवारी दीड लाख भाविक
By admin | Published: February 1, 2016 12:05 AM2016-02-01T00:05:13+5:302016-02-01T00:05:13+5:30
राज्यात सर्वाधिक काळ चालणाऱ्या बहिरम महाजत्रेच्या शेवटच्या आठवड्यात शेवटच्या रविवारी दीड लाखांवर यात्रेकरुंनी गर्दी केली.
नरेंद्र जावरे परतवाडा
राज्यात सर्वाधिक काळ चालणाऱ्या बहिरम महाजत्रेच्या शेवटच्या आठवड्यात शेवटच्या रविवारी दीड लाखांवर यात्रेकरुंनी गर्दी केली. लाखांवर नारळ भाविकांनी बहिरमबुवाला अर्पण केले. यात्रेत रेकॉर्डब्रेक गर्दी पाहता ही यात्रा आणखी दोन आठवडे लांबण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मध्य प्रदेशच्या खंडवा, भोपाळपासून तर नागपूर, अकोला, औरंगाबादपर्यंतच्या भक्तांनी बहिरम यात्रेत गर्दी केली. २१ डिसेंबरपासून या यात्रेला सुरुवात झाली. सुरुवातीचे काही आठवडे यात्रा ओस पडल्याचे चित्र दिसत होते. मात्र, मागिल तीन आठवड्यांपासून बहिरम यात्रेत भाविकांची गर्दी वाढू लागल्याने यात्रेला रंगत चढली होती. दरवर्षीचा अनुभव पाहता बहिरम यात्रेत शेवटच्या आठवड्यात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. पौषातील शेवटच्या रविवारचे औचित्य साधून लाखो भाविकांनी नवसाची फेड केली.
रविवार ठरला सुटीचा वार
अमरावती : वाहनांची प्रचंड गर्दी झाल्याने वाहन स्थळ तुंबले होते. परिणामी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शनिवार, रविवार सुटीचे दिवस पाहता शासकिय कर्मचारी, शाळा-महाविद्यालयाचे विद्यार्थी व शेतकरी, शेतमजूर यांना हे सोयीचे असल्याने रविवारी दीड लाखावर यात्रेकरु व दहा हजारावर वाहनांची गर्दी होती. दुपारी २ वाजता करजगाव मार्गे वाहतूक वळविण्यात आली होती. बहीरमबुवाच्या बहीरम यात्रेत येवून दर्शनासाठी सुद्धा भक्तांची लांब रांग लागली होती. रविवारी यात्रेत लाखावर नारळ फुटल्याचा अंदाज स्थानीय बहीरमबाबा संस्थान प्रशासनातर्फे वर्तविण्यात आला. नारळाचे टोकर ट्रकने शेवटी फेकावे लागत असल्याची माहिती देवस्थानतर्फे देण्यात आली.