बुलंद भारत की बुलंद तस्वीर ‘हमारे बजाज’!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 11:26 AM2022-02-13T11:26:23+5:302022-02-13T11:28:02+5:30
पुणे ते औरंगाबाददरम्यान आज जी सुबत्ता दिसते, त्यात राहुल बजाज यांचा मोठा वाटा आहे. केवळ राज्यच नव्हे, तर संपूर्ण देशाच्या औद्योगिक विकासात त्यांचा वाटा होता. त्यांचं सामाजिक योगदानही फार मोठं हाेतं. गेल्या अनेक दशकांपासून त्यांचे आणि दर्डा परिवाराचे जवळचे संबंध राहिले आहेत.
राजेंद्र दर्डा, माजी मंत्री आणि एडिटर इन चीफ, लोकमत समूह
इंदिराजी असो की नरेंद्र मोदीजी; सत्तेवर कुणीही असो, ‘डरो मत, कुछ तो करो,’ अशा बाणेदार वृत्तीने आपली ठाम भूमिका मांडणारे ज्येष्ठ उद्योगपती पद्मभूषण राहुल बजाज यांच्या निधनाने राष्ट्राची मोठी हानी झाली आहे. राहुल बजाज यांनी ५० वर्षे बजाज ऑटोमोबाइल उद्योगाचे इतके समर्थपणे नेतृत्व केले की, घराघरांत ‘हमारा बजाज’ हे वाक्य लोकप्रिय झाले.
पुणे ते औरंगाबाददरम्यान आज जी सुबत्ता दिसते, त्यात राहुल बजाज यांचा मोठा वाटा आहे. केवळ राज्यच नव्हे, तर संपूर्ण देशाच्या औद्योगिक विकासात त्यांचा वाटा होता. त्यांचं सामाजिक योगदानही फार मोठं हाेतं. गेल्या अनेक दशकांपासून त्यांचे आणि दर्डा परिवाराचे जवळचे संबंध राहिले आहेत.
प्रचंड मेहनत घेणारे, प्रामाणिकपणाशी तडजोड न करणारे आणि व्यावसायिक मूल्ये जपणारे राहुल बजाज आम्ही अनेकदा अनुभवले आहेत. महाराष्ट्र राज्याचा उद्योगमंत्री असताना त्यांच्याशी अनेकदा चर्चा करण्याचा योग आला. त्यांचे मार्गदर्शन मिळाले. राहुल बजाज यांनी बजाज उद्योगसमूहाला उद्योगाविषयी दूरदृष्टी आणि त्यासाठी व्यवहार व तत्त्वज्ञान पायाभूत स्वरूपात दिले. या उद्योगसमूहाची सूत्रे त्यांनी १९६५ ला आपल्या हाती घेतली. राहुल बजाज यांनी आकुर्डी, वाळूज आणि चाकण येथे दुचाकी उत्पादनाचा कारखाना सुरू केला. १९८६ मध्ये बजाजने चेतक स्कूटर निर्माण केली आणि चेतक मिळविण्यासाठी किमान १० वर्षांची ग्राहक प्रतीक्षा यादी लागलेली असे. त्यावेळी उत्पादनाची गुणवत्ता हेच ग्राहकप्रियतेचे मुख्य कारण होते.
मला एक किस्सा आठवतो की, राहुल बजाज यांचे वडील कमलनयनजी बजाज हे विदर्भातील वर्धा लोकसभा मतदारसंघात १९५७ ते १९७१ या काळात तीनदा निवडून आले होते. वर्धा लोकसभा मतदारसंघात त्यावेळी यवतमाळ जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघ वणी आणि पांढरकवडा यांचा समावेश होता. त्यावेळी यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माझे वडील ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा होते. त्यामुळे दर्डा परिवाराचे आणि बजाज परिवाराचे ऋणानुबंध वर्षानुवर्षे राहिले आहेत. परस्परांविषयी जिव्हाळा आवर्जून सांभाळला जायचा. मात्र वैयक्तिक संबंध आणि व्यावसायिक संबंध यांतील सीमारेषा त्यांच्या मनात काटेकोर असत. एक उदाहरण द्यायचं, तर ‘लोकमत’चंच देता येईल. १९७४ ची ती घटना आहे. त्यावेळी विदर्भात ‘लोकमत’ तुलनेने अत्यंत नवा होता. ‘लोकमत’चे चेअरमन विजयबाबू दर्डा यांनी राहुल बजाजजींना एक पत्र लिहिलं आणि त्यात दर्डा परिवार आणि बजाज परिवाराच्या घनिष्ठ संबंधांचा उल्लेख केला. आपण ‘लोकमत’साठी बजाजच्या जाहिराती नियमितपणे द्याव्यात, अशी विनंती केली. त्यांचे उत्तर आले. त्यात त्यांनी म्हटलं होतं की, ही गोष्ट खरी आहे की, दर्डा परिवाराचे आणि आमचे घनिष्ठ ऋणानुबंध आहेत. मात्र मी गुणवत्तेवरच जाहिरात देतो. ज्या वृत्तपत्राचा क्रमांक पहिला असतो, त्यांनाच आमच्या जाहिराती जातात. त्या वर्षी बजाजच्या जाहिराती ‘लोकमत’ला मिळाल्या नाहीत; परंतु नंतरच्या काळात लोकमत जनमानसात रुजला, विस्तार झाला, त्याने ‘पहिल्या क्रमांकाचं महाराष्ट्रातील दैनिक’ असा लौकिक संपादन केला आणि तेव्हापासून बजाज समूहाच्या ‘लोकमत’ला नियमित जाहिराती असतात. गुणवत्तेसाठी त्यांची यातील तळमळ निश्चितपणे स्पष्ट होते.
प्रसन्नता आणि टवटवीतपणा हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं वैशिष्ट्य होतं. ते जिथे जायचे तिथे त्यांच्याभोवती माणसांचा गराडा असायचा. गप्पा आणि किस्से यांत ते रमले की खूप वेळ बाेलायचे आणि मग संवेदनशीलता दाखवत ते हळूच विचारायचे, ‘बोअर तो नहीं हुआ?’ ही गोष्ट खरी आहे की, राहुल बजाज यांच्यासारखी एक सर्जनशील, संवेदनशील व्यक्ती फार पाहण्यास मिळत नाही.
ज्यावेळी भारतात मुक्त अर्थव्यवस्था आली, त्यावेळी स्वस्तात होणारी आयात आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचा देशांतर्गत सैलसर सुळसुळाट यासंबंधी त्यांनी प्रसंगी कठोर भूमिकाही मांडली. विकसनशील भारताच्या वेगवान प्रगतीची तळमळ त्याच्यामागे होती. ते म्हणायचे की, भारत देश यामुळे मोठा आणि सामर्थ्यवान नाही की, आम्ही भौगोलिकदृष्ट्या फार मोठे आहोत किंवा आमची लोकशाही फार महान आहे. आम्ही यासाठी शक्तिशाली आहोत; कारण आमच्या देशातील माणसं मेहनती आणि कल्पक आहेत. बजाज ऑटोमध्ये त्यांनी प्रचंड सुधारणा घडवून आणल्या. वाळूज आणि चाकणसारख्या ठिकाणी जागतिक दर्जाची ऑटोमोबाईल इंडस्ट्री उभी केली. संशोधन आणि विकास यांना महत्त्व दिले. ग्राहक हाच मुख्य केंद्रबिंदू मानून कोणत्याही उद्योगात काम करावे लागते. बजाज उद्योगात स्कूटरपाठोपाठ तीनचाकी वाहने, मोटारसायकल अशी विविधता त्यांनी आणली.
२००१ साली त्यांना भारत सरकारने ‘पद्मभूषण’ने सन्मानित केले. केवळ उद्योगातच नव्हे, तर प्राथमिक शिक्षण, आरोग्य, शेती अशा विविध क्षेत्रांतही राहुल बजाज यांनी काम केले आहे. ‘कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री’ या प्रतिष्ठित संस्थेचे नेतृत्व राहुल बजाज यांनी दोन वेळा केले. फ्रान्स सरकारने त्यांना प्रतिष्ठीत पुरस्काराने सन्मानित केले. भारत सरकार, सेबी, न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंज अशा कितीतरी स्तरांवर बजाज यांचे कर्तृत्व आणि विचार यांची दखल घेतली आहे आणि सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी योग्य वेळेला आपल्या नव्या पिढीकडे उद्योगाची जबाबदारी सुपुर्द केली. आज राजीव बजाज आणि संजीव बजाज समर्थपणे त्यांचा वारसा पुढे चालवीत आहेत.
ज्या वेळेला राहुल बजाज महाराष्ट्र विधानसभेतून राज्यसभेवर २००६ साली निवडून गेले, त्यावेळी त्यांना तीन पक्षांचा पाठिंबा होता. मी आमदार या नात्याने मतदार होतो; परंतु पक्षाची भूमिका आणि आदेश यांना मी बांधील होतो. त्यामुळे मी बजाज यांना मतदान केले नाही. मात्र हे माहीत असूनही त्यांनी कधीही यासंबंधी चर्चा केली नाही. मला मत का दिले नाही, असे मला त्यांनी कधीही विचारले नाही.
पुणे ‘लोकमत’च्या वास्तू लोकार्पण सोहळ्यात राहुलजींची विशेष उपस्थिती होती. त्यांनी त्या वेळेस व्यक्त केलेले परखड, चिंतनीय विचार आणि दिशादर्शक वैचारिक भूमिका आजही आम्हाला आठवते.
भारताच्या विकासासाठी दूरदृष्टी ठेवून रचनात्मक काम करणारे, आव्हानांशी मुकाबला करण्याची प्रेरणा देणारे राहुल बजाज यांच्या कर्तबगारीचे तेजोवलय भारतीय क्षितिजावर अनेक वर्षे तळपत राहील, हे मात्र खरे.