पुलवामातील हुतात्म्यांसाठी हमीद देणार ११० कोटी रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 05:57 AM2019-03-05T05:57:52+5:302019-03-05T05:58:04+5:30
पुलवामात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ४० जवानांचा १४ फेब्रुवारी रोजी आत्मघाती हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर जवानांच्या कुटुंबियांसाठी मुर्तझा ए. हामीद (४४) यांनी त्यांच्या करपात्र उत्पन्नातून ११० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.
कोटा (राजस्थान) : पुलवामात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ४० जवानांचा १४ फेब्रुवारी रोजी आत्मघाती हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर जवानांच्या कुटुंबियांसाठी मुर्तझा ए. हामीद (४४) यांनी त्यांच्या करपात्र उत्पन्नातून ११० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.
जन्मापासून अंध असलेले मुर्तझा हमीद हे मूळचे कोटाचे असून सध्या ते मुंबईत वास्तव्यास असतात. हे ११० कोटी रूपये पंतप्रधान राष्ट्रीय सहायता निधीत जमा होतील. मुर्तझा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाला मेलही पाठवला आहे.
हमीद म्हणाले की, या सहायता निधीचे उपसचिव अग्नी कुमार दास यांनी मला माझी सविस्तर माहिती पाठवण्यास सांगितले आहे. हमीद यांनी देशासाठी प्राण अर्पण केलेल्यांना पाठिंबा म्हणून देणगी देण्याचा निर्णय घेतला.
ते म्हणाले, माझ्या वैज्ञानिक नवीन तंत्राचा वापर करून पुलवामासारखे हल्ले टाळता येऊ शकतील. हामीद यांचे ‘फ्युएल बर्न रेडिएशन टेक्नॉलॉजी’ हे वैज्ञानिक तंत्र ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीएस) किंवा इतर तांत्रिक उपकरण नसलेली वाहने शोधून काढू शकते. सप्टेंबर २०१६ मध्ये हामीद यांनी आपला प्रस्ताव सरकारला आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला (एनएचएआय) पाठवला होता. त्याला आॅक्टोबर २०१८ मध्ये मंजुरी मिळाली. सरकारला विनामूल्य उपकरण देण्याची माझी तयारी आहे, असेही हामीद म्हणाले. (वृत्तसंस्था)
>स्वत: संशोधक
हमीद यांनी वाणिज्य शाखेत पदवी कोटातील सरकारी महाविद्यालयातून मिळवली. ते सध्या मुंबईत संशोधक व वैज्ञानिक म्हणून काम करीत आहेत. वाणिज्य शाखेचे पदवीधर असूनही विज्ञान व तंत्रज्ञानात नवीन तंत्राला कसे विकसित केले, असे विचारले असता ते म्हणाले, २०१० मध्ये जयपूरमध्ये पेट्रोलपंपावर लागलेल्या आगीमुळे मला ही प्रेरणा मिळाली.
मोबाईल फोनवर बोलत असताना इंधनाने पेट घेतला तो कशामुळे यावर मला अभ्यास करावा वाटला.