'ये हम है.. ये हमारी कार है... और ये हमारी पार्टी हो रही है!' बुलडोझरसोबत अधिकाऱ्याचा स्टेटस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 04:37 PM2022-04-21T16:37:33+5:302022-04-21T16:37:54+5:30
नायब तहसीलदारांच्या व्हॉट्स ऍप स्टेटसची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा
लखनऊ: योगी सरकार सत्तेत आल्यापासून माफिया आणि गुन्हेगारांविरोधात कारवाया सुरू आहेत. अनेक माफिया आणि गँगस्टर्सच्या संपत्त्यांवर टाच आणली जात आहे. काहींच्या स्थावर मालमत्तांवर थेट बुलडोझरनं कारवाई होत आहे. आता सरकारी अधिकारी बुलडोझरसोबतचे फोटो टाकू लागले आहेत. हमीरपूर जिल्ह्यात असाच काहीसा प्रकार घडला. तिथल्या नायब तहसीलदारांनी कारवाईदरम्यान काही फोटो काढले. ते व्हॉट्स ऍपवर स्टेटसला ठेवले. आता या फोटोंची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा आहे.
कुरारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पतारा गावात काल कुख्यात गँगस्टर रोहित यादवच्या मालमत्तांवर तोडक कारवाई करण्यात आली. या कारवाईवेळी पोलीस आणि प्रशासकीय उपस्थित होते. यादवच्या मालकीच्या जमिनीवरील बांधकाम जमीनदोस्त केलं. कारवाईवेळी नायब तहसीलदार रमेश सचान तिथेच हजर होते.
कारवाई सुरू असताना सचान यांनी काही फोटो काढले. त्यानंतर त्यांनी तीन फोटो व्हॉट्स ऍपवर स्टेटस म्हणून अपलोड केले. पहिल्या फोटोला सचान यांनी 'ये हम है, ये हमारी कार है' असं कॅप्शन दिलं. तर दुसऱ्या फोटोला 'ये हमारी पार्टी हो रही है' आणि तिसऱ्या फोटोला 'दो दो कारे', अशी कॅप्शन्स दिली. सचान यांच्या व्हॉट्स ऍप स्टेटसची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा आहे. याबद्दल एका हिंदी वृत्तसंकेतस्थळानं सचान यांच्याशी संपर्क साधला. त्यावर 'सध्या मी अलाहाबाद उच्च न्यायालयात आहे. नंतर बोलू', असं उत्तर सचान यांनी दिलं.