STFने आठ पोलिसांची हत्या करणाऱ्या विकास दुबेचा उजवा हात असलेल्या अमर दुबेला केले ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 08:15 AM2020-07-08T08:15:48+5:302020-07-08T08:16:56+5:30
यूपी एसटीएफच्या माहितीनुसार जेव्हा त्यांनी अमर दुबेला घेराव घातला, तेव्हा त्याने गोळीबार सुरू केला. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात अमर दुबे ठार झाला.
हमीरपूरः चौबेपूरमधील आठ पोलिसांच्या हत्येप्रकरणी फरार असलेला विकास दुबेचा जवळचा सहकारी अमर दुबे याला बुधवारी सकाळी एनकाऊंटरमध्ये यूपी एसटीएफने गोळ्या घालून ठार केले. हमीरपूरच्या मौदहा या चकमकीत अमर दुबेचा खात्मा करण्यात आला आहे. कानपूर प्रकरणानंतर अमर दुबे हासुद्धा फरार होता. यूपी एसटीएफच्या माहितीनुसार जेव्हा त्यांनी अमर दुबेला घेराव घातला, तेव्हा त्याने गोळीबार सुरू केला. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात अमर दुबे ठार झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, ही चकमक बुधवारी सकाळी साडेसहा वाजता करण्यात आली आहे. असं सांगितलं जात आहे की, अमर हा मौदहात त्याच्या जवळच्या नातेवाईकाच्या घरी लपलेला होता. यापूर्वी तो फरीदाबाद येथे लपला होता, परंतु यूपी एसटीएफच्या शोध मोहिमेनंतर त्यानं तेथून पळ काढला होता. अशा परिस्थितीत एसटीएफने त्यांचा पाठलाग करत त्याला घेराव घातला असता, त्याने गोळीबार सुरू केला.
Kanpur encounter case: Amar Dubey, close aide of history-sheeter Vikas Dubey, has been killed in an encounter with Uttar Pradesh Special Task Force (STF) in Hamirpur today. pic.twitter.com/dygqgNaUNP
— ANI UP (@ANINewsUP) July 8, 2020
चौबेपूर शूटआऊटमध्ये सहभागी होता अमर
चकमकीत मारला गेलेला अमर दुबे हा गुंड विकास दुबेचा उजवा हात असल्याचे सांगितले जाते. तो चिकापूरच्या विक्रू गावातल्या झालेल्या शूटआऊटमध्ये सामील झाला होता आणि पोलिसांनीही त्याच्यावर 25 हजारांचे बक्षीस जाहीर केले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना त्याला ठार मारायचे नव्हते, तर जिवंत पकडण्याची इच्छा होती. पण जेव्हा एसटीएफने त्याला शरण येण्यास सांगितले, तेव्हा त्याने गोळीबार सुरू केला. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तो ठार झाला.
दुसरीकडे, मुख्य आरोपी विकास दुबे अद्यापही फरार आहे. त्याला त्याचा एन्काऊंटर होईल ही भीती सतावते आहे. तो आपल्या वकिलांच्या माध्यमातून न्यायालयात आत्मसमर्पण करण्याच्या प्रयत्नात असल्याचे सांगितले जात आहे. त्याचे शेवटचे ठिकाण फरीदाबादमध्ये सापडले, जेव्हा तो हॉटेलमध्ये राहण्यासाठी खोली घेण्यास आला होता. पण पोलीस येईपर्यंत तो निघून गेला. आता एसटीएफने फरीदाबाद येथून त्याच्या जवळच्या दोन साथीदारांची चौकशी सुरू केली आहे. तो हरियाणा किंवा दिल्ली कोर्टात शरण जाण्याचा प्रयत्न करीत असल्याचा पोलिसांना संशय आहे.