हातमाग कामगार व्यवसायापासून दूर
By admin | Published: May 6, 2016 02:34 AM2016-05-06T02:34:45+5:302016-05-06T02:34:45+5:30
उत्पन्नाअभावी देशातील हातमाग कामगारांची संख्या कमी होत असून, बहुतेक कुटुंबांनी तो व्यवसाय सोडून दिल्याची माहिती गुरुवारी लोकसभेत देण्यात आली.
नवी दिल्ली : उत्पन्नाअभावी देशातील हातमाग कामगारांची संख्या कमी होत असून, बहुतेक कुटुंबांनी तो व्यवसाय सोडून दिल्याची माहिती गुरुवारी लोकसभेत देण्यात आली.
प्रश्नोत्तराच्या तासात वस्त्रोद्योगमंत्री संतोष गंगवार म्हणाले की, हातमाग कामगारांची परिस्थिती सुधारण्यासाठी सरकारने एक योजना आखली असून, त्यानुसार या हातमाग कामगारांना दररोज किमान ५०० रुपये उत्पन्न मिळावे हा त्यामागचा हेतू आहे. या उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी ७ आॅगस्ट हा ‘राष्ट्रीय हातमाग दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. याशिवाय ‘भारत हॅण्डलूम ब्रॅण्ड’ सुरू करण्यात आला असून, त्याद्वारे या उत्पादनाचा लोकांना दर्जा समजावून सांगण्याचा सरकारचा हेतू आहे. आमच्या या प्रयत्नांचे चांगले परिणाम दिसत आहेत. याबाबत एक क्लस्टर तयार करण्यासाठी मंजूर करण्यात आलेला ६० लाख रुपयांचा निधी वाढवून २ कोटी रुपये करण्यात आला आहे. पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना मंत्रीमहोदय म्हणाले की, हातमाग आणि पॉवरलूम या दोन्ही क्षेत्रातील उत्पादन वाढावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आधुनिकतेचा अभाव, उत्पादनविषयक पायाभूत सेवांचा अभाव, दुर्बल वित्तीय स्थिती यामुळे पॉवरलूम क्षेत्रापुढे विविध समस्या उभ्या राहिल्या आहेत.