मोदींच्या पाठीवर हात! राष्ट्रपतींना भेटताना होते, पण पत्रकार परिषदेतून गायब झाले शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 11:30 AM2023-08-03T11:30:12+5:302023-08-03T11:31:00+5:30
विरोधकांच्या आघाडीचे नेते गेल्या आठवड्यात मणिपूरमध्ये गेले होते. तेथील परिस्थिती या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन सांगितली होती. यानंतर ते राष्ट्रपतींनी भेटणार होते. बुधवारी हे नेते राष्ट्रपतींनी भेटले.
लोकसभा निवडणुकीला अद्याप नऊ महिने बाकी आहेत. तोवर राज्याराज्यात बरेच राजकारण घडून जाणार आहे. आता एकत्र दिसत असलेले विरोधक कधी एकेक करून गळून पडतील सांगता येत नाहीय अशी परिस्थिती आहे. काही दिवसांपूर्वी राज्यसभेतील कमी संख्याबळ असल्याने दिल्ली विधेयकावरून विरोधक अतीआत्मविश्वासात असताना अचानक एनडीएला समर्थन देणाऱ्या सदस्यांची संख्या १६ ने वाढली आहे. यातच आता ज्यांच्याबद्दल कधीच काही सांगता येत नाही अशा शरद पवारांनी विरोधकांच्या हातावर तुरी दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
विरोधकांच्या आघाडीचे नेते गेल्या आठवड्यात मणिपूरमध्ये गेले होते. तेथील परिस्थिती या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन सांगितली होती. यानंतर ते राष्ट्रपतींनी भेटणार होते. बुधवारी हे नेते राष्ट्रपतींनी भेटले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आप नेते संजय सिंह, सपा नेते राम गोपाल यादव यांच्यासह भारतातील अनेक नेते राष्ट्रपतींसोबतच्या बैठकीला उपस्थित होते.
विरोधी नेत्यांनी मणिपूरमध्ये विलंब न करता शांतता आणि एकोपा स्थापन करण्यासाठी तत्काळ हस्तक्षेपाची मागणी केली. पंतप्रधान मोदींना मणिपूरच्या मुद्द्यावर संसदेत निवेदन देण्याचे आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी तातडीने मणिपूरला जाण्याचे निर्देश देण्याची मागणी त्यांनी राष्ट्रपतींना केली. मात्र बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत असे काही घडले, जे या नेत्यांना अपेक्षित नव्हते.
राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर खर्गे पत्रकारांशी बोलत होते. या पत्रकार परिषदेला इतर सर्व नेते उपस्थित होते. परंतू शरद पवार नव्हते. शरद पवार येत असतील असे खर्गेंना वाटले आणि ते त्यांना आजुबाजुला शोधू लागले. परंतू, पवार आलेच नाहीत. राष्ट्रपतींना भेटताना मात्र पवार शिष्टमंडळासोबत होते. यामुळे लगेचच पुण्यातील मोदींचा कार्यक्रम आणि पवारांची उपस्थिती, मोदींच्या पाठीवर ठेवलेला हात याची चर्चा रंगू लागली होती.