"दंगेखोरांना उलटे टांगू", गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2023 11:58 AM2023-04-03T11:58:34+5:302023-04-03T11:59:25+5:30

नितीशकुमार यांना भाजपची दारे बंद; महागठबंधन सरकार पडणार!

Hang the rioters upside down warns Union Home Minister Amit Shah | "दंगेखोरांना उलटे टांगू", गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा

"दंगेखोरांना उलटे टांगू", गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, नवादा (बिहार): बिहारमध्ये आमचे सरकार आल्यास दंगेखोरांना उलटे टांगून सरळ करू, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे. राज्यातील पाच जिल्ह्यांत झालेल्या हिंसाचाराचा उल्लेख करून ते म्हणाले की, मला सासाराममध्ये जायचे होते; परंतु दुर्दैवाने तेथे हिंसाचार झाल्यामुळे मी जाऊ शकत नाही. यासाठी तेथील जनतेची क्षमा मागतो. संपूर्ण बिहारची चिंता वाटत आहे. बिहारशरीफ, सासाराममध्ये जाळपोळ झाली. २०२४ मध्ये मोदींना पूर्ण बहुमत द्या आणि २०२५ मध्ये बिहारमध्ये भाजपचे सरकार स्थापन करा. मग पाहा, दंगेखोरांना सरळ करण्याचे काम भाजप करील, असेही शाह म्हणाले.

नवादा येथील सभेत शाह म्हणाले की, नितीशकुमार यांना भाजपची दारे कायमची बंद झाली आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील महागठबंधन सरकार पडणार आहे व आमचे सरकार येणार आहे.

‘सुपारीबाजांची नावे द्या, त्यांच्यावर खटला चालवू’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सुपारी’ टिप्पणीवर, राज्यसभा सदस्य कपिल सिब्बल यांनी रविवारी त्यांना त्यांची प्रतिमा डागाळण्यासाठी ज्यांनी सुपारी दिली त्यांची नावे सांगा, त्यांच्यावर खटला चालवू, असे आव्हान दिले. भोपाळमधील राणी कमलापती रेल्वेस्थानकावर वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखविल्यानंतर, मोदी म्हणाले होते, ‘‘आपल्या देशात असे काही लोक आहेत, ज्यांनी मोदींची प्रतिमा डागाळण्याचा संकल्प केला आहे.”  पंतप्रधान म्हणाले होते, “यासाठी या लोकांनी विविध लोकांना सुपारी दिली आहे. या लोकांना आधार देण्यासाठी काही लोक देशाच्या आत आहेत तर काही देशाबाहेर बसून आपले काम करत आहेत.”

काय म्हणाले सिब्बल?

या टिप्पणीला प्रत्युत्तर देताना सिब्बल म्हणाले, ‘‘मोदीजींचा आरोप : ‘त्यांनी मोदींची कबर खोदण्याचे कंत्राट देशातील आणि बाहेरील काही लोकांना दिले आहे.’ कृपया आम्हाला या लोकांची, संस्थांची किंवा देशांची नावे सांगा. हे काही सरकारी गुपित असू शकत नाही. आम्हाला त्यांच्यावर खटला चालवू द्या.”

लालूजी, तेजस्वींना मुख्यमंत्री करण्याचे विसरा!

अमित शाह म्हणाले की, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना पंतप्रधान व्हायचे आहे, तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. बिहारची जनता यात भरडून निघत आहे; परंतु देशाची जनता मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणार आहे. यामुळे लालूप्रसाद यादव यांनी विसरून जावे की, त्यांच्या मुलाला नितीशकुमार मुख्यमंत्री करतील. लालूंच्या मुलाला नितीशकुमार यांनी साप, पलटूराम व आणखीही काही म्हटले होते; परंतु आता नितीशकुमार पंतप्रधान होण्यासाठी त्यांच्याच बरोबर गेले आहेत.

एकजुटीची जबरदस्त लाट

राहुल गांधी यांना अपात्र ठरविण्यात आल्यामुळे “विरोधकांच्या एकजुटीची जबरदस्त लाट निर्माण झाली आहे. विरोधी पक्षांना एकीचे महत्त्व समजू लागले आहे. जर विरोधी पक्षांना एकत्र येण्याचे नवीन कारण मिळाले आणि त्यांनी एकमेकांची मते खाणे थांबविले तर २०२४ च्या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळवणे खूप कठीण होऊ शकते. -शशी थरूर, काँग्रेस खासदार

१ एप्रिलपासून ३८४ अत्यावश्यक औषधांच्या आणि एक हजारपेक्षा जास्त फॉर्म्युलेशनच्या किमती ११ टक्क्यांहून अधिक वाढल्याची वृत्ते प्रसिद्ध झाली आहेत. ‘मोदीसाहेब, तुम्ही लोकांचे खिसे कापण्याची ‘सुपारी’ घेतली आहे. -मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे अध्यक्ष

Web Title: Hang the rioters upside down warns Union Home Minister Amit Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.