हंगपन दादा यांना मरणोत्तर ‘अशोकचक्र’
By Admin | Published: August 15, 2016 06:24 AM2016-08-15T06:24:09+5:302016-08-15T06:24:09+5:30
लष्करातील राष्ट्रीय रायफल्सचे हवालदार हंगपन दादा यांना यंदाच्या स्वातंत्र्यदिनी ‘अशोकचक्र’ हा सर्वोच्च बहुमान मरणोत्तर जाहीर करण्यात आला
नवी दिल्ली : दोन महिन्यांपूर्वी सीमेवरून काश्मीरमध्ये घुसू पाहणाऱ्या चार पाकिस्तान प्रशिक्षित सशस्त्र दहशतवाद्यांचा खात्मा करत, स्वत:च्याही प्राणांची बाजी लावून शहीद झालेले भारतीय लष्करातील राष्ट्रीय रायफल्सचे हवालदार हंगपन दादा यांना यंदाच्या स्वातंत्र्यदिनी ‘अशोकचक्र’ हा सर्वोच्च बहुमान मरणोत्तर जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील दोघांना शौर्य चक्रे, तर दोघांना सेना पदके जाहीर झाली आहेत.
तिन्ही सेनादलांचे सरसेनापती व राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी देशाचे स्वातंत्र्य आणि सुरक्षा यासाठी अतुलनीय शौर्य बजावणाऱ्या सेनादलांमधील आजी-माजी अधिकारी व जवानांना विविध पुरस्कार जाहीर केले. त्यापैकी शांतता काळात दिला जाणारा ‘अशोक चक्र’ हा सर्वोच्च बहुमान हवालदार हंगपन दादा यांना जाहीर झाला. काश्मीरच्या शमसाबारी या १३ हजार उंचीवरील बर्फाच्छादित पर्वतराजीत दादा यांनी चार घुसखोर अतिरेक्यांना २७ मे रोजी कंठस्नान घातले होते. दादा हे मूळचे अरुणाचल प्रदेशातील आहेत. ते आसाम रेजिमेंटच्या ३५ व्या बटालियन राष्ट्रीय रायफल्सचे हवालदार होते. राष्ट्रपतींनी अशोक चक्राखेरीज अन्य ८२ पुरस्कारांना मान्यता दिली आहे. यात १४ शौर्यचक्रे, ६३ सेनापदके, दोन नौसेना पदके आणि दोन वायू सेना पदकांचा समावेश आहे.
राज्यातील शौर्य पदक विजेत्यांमध्ये कॅ. गौरव शरद जाधव (रेजिमेंट आॅफ आर्टिलरी/राष्ट्रीय रायफल्स ३६ वी बटालियन) व नाईक शंकर चंद्रभान शिंदे (कॉर्पस आॅफ इंजीनियर्स/राष्ट्रीय रायफल्स ४४ वी बटालियन) यांचा समावेश आहे. शिंदे मुळचे नाशिक जिल्ह्यातील भयाळे गावातील होते. जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात अतिरेक्यांश्ी लढताना शहीद झालेल्या शिंदे यांना मरणोत्तर शौर्यचक्र जाहीर झाले आहे.
याखेरीज लान्स हवालदार रामेश्वर पुंडलिक दसपुते (कॉर्प््स आॅफ इंजीनियर्स/ राष्ट्रीय रायफल्स २री बटालियन) आणि गनर सदाशिव मारुती मोरे (रेजिमेंट आॅफ आर्टिलरी/राष्ट्रीय रायफल ४१ वी बटालियन) या राज्यातील शूर जवानांना सेवा मेडल जाहीर झाले. अतिरेक्यांशी लढताना हौतात्म्य आलेल्या मोरे यांचा मरणोत्तर गौरव करण्यात येणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)