LAC वर साडेचार वर्षांनंतर Happy Diwali, भारत आजपासून गस्त घालणार, मिठाई वाटली जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 10:13 AM2024-10-31T10:13:04+5:302024-10-31T10:14:21+5:30
India China News: मागच्या जवळपास साडेचार वर्षांपासून भारत आणि चीनमध्ये असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर असलेला तणाव अखेर निवळला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर यावर्षी बऱ्याच काळानंतर दिवाळीचं आनंदी वातावरण आहे.
मागच्या जवळपास साडेचार वर्षांपासून भारत आणि चीनमध्ये असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर असलेला तणाव अखेर निवळला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर यावर्षी बऱ्याच काळानंतर दिवाळीचं आनंदी वातावरण आहे. तसेच मागच्या साडे चार वर्षांपासून ज्या भागात तणावामुळे गस्त घालता येत नव्हती, अशा ठिकाणी आजपासून भारतीय लष्कर गस्त घालणार आहे. तसेच दिवाळी निमित्त भारत-चीन सीमेवरील सर्वांचं तोंड आज मिठाई भरवून गोड केलं जाणार आहे. एप्रिल २०२० पासून सुमारे साडेचार वर्षे राहिलेल्या तणावपूर्ण परिस्थितीनंतर भारत आणि चीनमध्ये देपसांग आणि डेमचोक परिसराचं निर्लष्करीकरण करणं आणि गस्त घालण्याबाबत एकमत झालं आहे.
पूर्व लडाखमधील देपसांग आणि डेमचोक परिसरामध्ये मागच्या साडेचार वर्षांपासून गस्त बंद होती. सीमेवरील तणावामुळे चिनी सैन्याने भारतीय लष्कराची गस्तीची वाट अडवली होती. मात्र मागच्या काही दिवसांत घडलेल्या घडामोडींनंतर दोन्ही देशांमधील तणाव बऱ्यापैकी निवळला असून, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पूर्वपार स्थितीत जाण्याबाबत दोन्ही देशांमध्ये एकमत झालं आले. त्यानंतर आजपासून भारतीय लष्कर या भागात गस्त घालण्यास सुरुवात करणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खराब हवामानामुळे डेमचोक परिसरामध्ये मंगळवारी व्हेरिफिकेशनचं काम होऊ शकलेलं नाही. मात्र बुधवारी एरियल व्हेरिफिकेशन करण्यात आलं. भारत आणि चीनचे ग्राऊंड कमांडर देपसांगमध्ये दोन आणि डेमचोकमध्ये एका ठिकाणी भेटले. तसेच दोन्ही बाजूंनी डिसएंगेजमेंटची पडताळणी करण्यात आली. डेमचोक आणि देपसांग येथे उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या चौक्या आणि तंबू हटवण्यात आल्यानंतर दोन्हीकडचे सैनिक एप्रिल २०२० पूर्वीच्या स्थितीत गेले आहेत. आता आज दिवाळीच्या निमित्ताने दोन्ही देशांचे सैनिक एकमेकांना मिठाई देतील. भारत आणि चीनमध्ये असलेल्या ६ बॉर्डर पर्सनल मिटिंग पॉईंटवर ही मिठाईची देवाण घेवाण होणार आहे. मात्र असं असलं तरी भूतकाळात चिनी सैन्याने केलेला दगाफटका पाहता भारतीय लष्कर चिनी सैन्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवणार आहे.