न्यू इंडियामध्ये गरिबी नको, सर्वजण सुखी राहावेत - राष्ट्रपती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2017 07:31 PM2017-08-14T19:31:56+5:302017-08-14T20:19:18+5:30
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित करताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी न्यू इंडियाचा ल्लेख केला. विकसित होत असलेला न्यू इंडिया आपल्या डीएनएमध्ये वसला पाहिजे.
नवी दिल्ली, दि. १४ - स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशवासीयांना संबोधित करताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी न्यू इंडियाचे चित्र देशासमोर उभे केले. या न्यू इंडियामध्ये सर्वजण सुखी राहावेत. गरिबीला स्थान असता कामा नये. हा न्यू इंडिया सर्वांच्या डीएनएमध्ये वसला पाहिजे. तसेच त्यात कोणत्याही प्रकारच्या भेदभावांना स्थान असता कामा नयेत, असे कोविंद म्हणाले.
देशाचे १५ वे राष्ट्रपती म्हणून नुकतीच शपथ घेतलेल्या कोविंद यांनी स्वातंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला प्रथमच देशवासियांना संबोधित केले. या संबोधनावेळी स्वातंत्रसैनिकांनी देशासाठी केलेला त्याग, देशाची होत असलेली प्रगती आणि सरकारच्या निर्णयांना जनतेकडून होत असलेले सहकार्य यांचा उल्लेख करतानाच राष्ट्रपतींनी वेगाने आकार घेत असलेल्या न्यू इंडियाचा ठळकपणे उल्लेख केला. ते म्हणाले, न्यू इंडिया डीएनएमध्ये वसला पाहिजे. ज्यात मानवतेचा समावेश असावा, न्यू इंडियामध्ये असा समाज असला पाहिजे ज्यात मुलगा-मुलगी, धर्मा अशा कुठल्याही प्रकारचे भेदभाव नसतील. तसेच या न्यू इंडियामध्ये गरिबीलाही स्थान नसेल. अशा न्यू इंडियामध्ये सर्वजण सुखी राहावेत.
देशाला संबोधित करताना राष्ट्रपतींनी स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानाला उजाळा दिला. त्यांनी महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचा विशेष उल्लेख केला. तसेच राजकीय लक्ष्य प्राप्त करणे हा या व्यक्तींचा उद्देश नव्हता, असे ते म्हणाले. "सरकारद्वारे सुरू करण्यात येणाऱ्या योजना सर्वांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. तसेच सरकार बेटी बचाव बेटी पढाओ अभियान चालवत आहे. मात्र मुलींसोबत कुठल्याही प्रकारचा भेदभाव होणार नाही हे निश्चित करण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे," असेही त्यांनी पुढे सांगितले.
नोटाबंदीवेळी देशवासियांनी दाखवलेल्या संयमाची राष्ट्रपतींनी प्रशंसा केली. तसेच गॅस सिलेंडचे अनुदान सोडणाऱ्या कोट्यवधी नागरिकांचेही त्यांनी कौतुक केले. गरीब मुलांना शिक्षण देण्यासाठी समाजातील सर्व स्तरातील व्यक्तींनी पुढाकार घ्यावा असे आवाहनही राष्ट्रपतींनी केले. तसेच देशातील शिक्षणाचा दर्जा उंचावला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
New India must include that integral humanist component that is in our DNA, & which has defined our country and our civilization: President
— ANI (@ANI) August 14, 2017