आनंद वार्ता! मान्सूनचे १ जूनला केरळमध्ये आगमन होणार, हवामान विभागाचा नवा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 15:44 IST2020-05-28T15:43:50+5:302020-05-28T15:44:21+5:30
मान्सूनचे गुरुवारी बंगालच्या उपसागरात आणखी काही भागात झाले आगमन

आनंद वार्ता! मान्सूनचे १ जूनला केरळमध्ये आगमन होणार, हवामान विभागाचा नवा अंदाज
पुणे : हवामान विभाग आज सकाळी एक आनंद वार्ता घेऊन आला आहे. मान्सूनचे आगमन नेहमीप्रमाणे १ जून रोजी केरळ येथे होणार असल्याची हवामान विभागाने आज जाहीर केला आहे. मान्सूनचे गुरुवारी बंगालच्या उपसागरात आणखी काही भागात आगमन झाले आहे. मालदिव, कोमोरिन क्षेत्रात आगमनाच्या दृष्टीने अनुकूल वातावरण असून येत्या ४८ तासात मान्सूनचे त्या भागात आगमन होण्याची शक्यता आहे.
अरबी समुद्रातील पूर्व मध्य अरब समुद्राच्या भागात कमी दाबाचे येत्या ४८ तासात तयार होण्याची शक्यता आहे. ४ जूननंतर त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता असून ते दक्षिण ओमान आणि पूर्व येमन देशाच्या दिशेने जाण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या काळात मच्छीमारांनी पश्चिम अरबी समुद्रात जाऊ नये, असा इशारा दिला आहे.
यापूर्वी हवामान विभागाने मान्सूनला येण्याचा उशीर होण्याची शक्यता असून तो ५ जूनला केरळला येण्याची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यात त्यांनी मॉडेल एरर ४ दिवस कमी किंवा जास्त दाखविले होते. नव्या अंदाजानुसार केरळमध्ये १ जूनला मॉन्सून धडकण्याची शक्यता आहे.