पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाकिस्तानी बहीण त्यांना 30व्यांदा राखी बांधणार, यावेळी काही खास असणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 12:17 PM2024-08-19T12:17:21+5:302024-08-19T12:18:19+5:30
Happy Raksha Bandhan 2024 : विशेष म्हणजे कमर शेख, या प्रत्येक रक्षाबंधनाला स्वतःच्या हाताने राखी तयार करतात आणि तीच पंतप्रधान मोदींना बांधतात.
गेल्या अनेक वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधणाऱ्या पाकिस्तानी महिला कमर शेख, या आज रक्षाबंधन प्रसंगी त्यांना पुन्हा एकदा राखी बांधणार आहेत. महत्वाचे म्हणजे, त्या पंतप्रधान मोदी यांना आज तिसव्यांदा राखी बांधतील. विशेष म्हणजे कमर शेख, या प्रत्येक रक्षाबंधनाला स्वतःच्या हाताने राखी तयार करतात आणि तीच पंतप्रधान मोदींना बांधतात. इंडिया टुडेसोत बोलताना त्यांनी सांगितले की, "मी प्रत्येक रक्षाबंधनापूर्वी स्वतःच्या हाताने बऱ्याच राख्या तयार करते आणि शेवटी मला जी राखी सर्वात जास्त आवडते, ती मी त्यांना बांधते."
यावेळी काही खास -
कमर शेख सांगतात, "मी या वर्षी जी राखी तयार केली आहे, तिच्यासाठी मखमल वापरली आहे. या राखीत मी मोती, धातूची नक्षी आणि टिक्की वापरली आहेत." त्या सांगतात, त्यांना कोरोना महामारीच्या काळात म्हणजेच 2020, 2021 आणि 2022 मध्ये प्रवास करणे शक्य झाले नाही. गेल्या वर्षात त्यांनी पुन्हा आपला दिल्ली प्रवास सुरू केला आणि यावेळीही त्यांना पंतप्रधान मोदींना राखी बांधण्याची आशा आहे.
कोण आहेत कमर शेख? -
कमर शेख यांचा जन्म पाकिस्तानातील कराची येथील एका मुस्लीम कुटुंबात झाला. 1981 मध्ये मोशीन शेख यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला. यानंतर त्या भारतातच स्थाइक झाल्या. शेख यांचा दावा आहे की, 1990 मध्ये गुजरातचे तत्कालीन राज्यपाल दिवंगत डॉ. स्वरूप सिंह यांच्यामाध्यमाने त्यांची पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट झाली. ही भेट विमानतळावर झाली होती. तेथे सिंह यांनी त्यांची मोदींसोबत ओळख करून दिली. तेव्हा सिंह म्हणाले होते की, मी कमर शेखला आपली मुलगी मानतो, यावर मोदी म्हणाले होते की, मी त्यांना आपली बहीण मानेल. तेव्हापासून मी त्यांना रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधते, असेही शेख यांनी म्हटले आहे.