लाईनमनचा कारनामा! हेल्मेटशिवाय पेट्रोल देण्यास नकार मिळताच विजेच्या खांबावर चढला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 13:17 IST2025-01-15T13:17:01+5:302025-01-15T13:17:46+5:30
वीज विभागाच्या एका लाईनमनचा कारनामा पाहायला मिळाला आहे.

फोटो - ABP News
उत्तर प्रदेशातील हापूरमध्ये वीज विभागाच्या एका लाईनमनचा कारनामा पाहायला मिळाला आहे. पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी त्याला हेल्मेटबाबतचे नियम शिकवले तेव्हा तो लाईनमन चिडला आणि त्याने थेट पेट्रोल पंपाचा वीजपुरवठाच खंडित केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या घटनेनंतर वीज विभागात एकच खळबळ उडाली. अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
हापूरमधील परतापूर रोडवर भारत पेट्रोलियमचा पेट्रोल पंप आहे. येथे जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश लावण्यात आला आहे, ज्यामध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे की, हेल्मेटशिवाय कोणत्याही वाहनचालकाला पेट्रोल देऊ नये. जेव्हा पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी हे नियम पाळले तेव्हा त्यांना सरकारी वीज विभागाच्या लाईनमनशी सामना करावा लागला. लाईनमनने स्वतःला वीज विभागाचा कर्मचारी म्हणून ओळख दिली आणि बाईकमध्ये पेट्रोल भरण्यास सांगितलं. पण पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांनी त्याचं ऐकलं नाही आणि त्याला हेल्मेट घालण्यास सांगितलं.
पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी डीएमच्या आदेशांचे उल्लंघन करण्यास स्पष्टपणे नकार दिला. हेल्मेटशिवाय पेट्रोल न मिळाल्याने लाईनमनला राग आला. त्यानंतर तो चिडला आणि त्याने आपली बाईक बाजूला उभी केली आणि पेट्रोल पंपाबाहेरील विजेच्या खांबावर चढून पेट्रोल पंपाचा वीजपुरवठा खंडित केला. यामुळे पेट्रोल पंपावरील सर्व मशीन्सने काम करणं बंद केलं आणि पंपावरील पेट्रोल पुरवठा काही काळासाठी बंद झाला.
पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांनी पंप मालकाला याची माहिती दिली तेव्हा पंप मालकाने पोलिसांकडे तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचताच, पेट्रोलपंपाचा वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.