Har Ghar Tiranga: 'हर घर तिरंगा' अभियान काय आहे?; राष्ट्रध्वज फडकवण्याचे नियम जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 10:43 AM2022-08-13T10:43:01+5:302022-08-13T10:43:52+5:30
तिरंगा मोहिमेच्या माध्यमातून भारतातील प्रत्येक घरात तिरंगा फडकवण्याची सरकारची योजना आहे.
मुंबई - १५ ऑगस्ट २०२२ रोजी भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी ७५ वा स्वातंत्र्य दिन आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. सरकारनेही स्वातंत्र्याची ७५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल देशात अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या महोत्सवानिमित्त सरकारनं हर घर तिरंगा अभियान(Har Ghar Tiranga) हाती घेतले आहे. या मोहिमेअंतर्गत १३ ते १५ ऑगस्ट या काळात प्रत्येक घरावर तिरंगा फडकणार आहे. प्रत्येक स्वातंत्र्य देशाचा स्वत:चा राष्ट्रीय ध्वज असतो. भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा आहे.
'हर घर तिरंगा' अभियान काय आहे?
तिरंगा मोहिमेच्या माध्यमातून भारतातील प्रत्येक घरात तिरंगा फडकवण्याची सरकारची योजना आहे. यासाठी सरकारने २० कोटी घरांचे उद्दिष्ट ठेवले आहे. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान जन भारत सोबत हे लक्ष्य साध्य करण्याची सरकारची योजना आहे. आज प्रत्येक घरात तिरंगा मोहीम राबवली जात आहे, पण एक काळ असा होता की प्रत्येक घरावर तिरंगा फडकवता येत नव्हता, असे अनेक बदल घडले, ज्यानंतर सामान्य माणूस घर, कार्यालय, शाळांमध्ये तिरंगा फडकवू शकतो.
२००२ मध्ये ध्वज संहितेत बदल केल्यानंतर सर्वसामान्यांना हा अधिकार मिळाला. आज जेव्हा प्रत्येक घरात तिरंगा फडकवण्याची चर्चा आहे, अशा परिस्थितीत आम्ही तिरंग्याच्या ध्वज संहितेतील तरतुदींबद्दल सांगत आहोत. भारतीय ध्वज संहितेच्या कलम २.१ नुसार, प्रत्येक व्यक्तीला सार्वजनिक, खाजगी किंवा शैक्षणिक संस्थेत तिरंगा फडकविण्याचे स्वातंत्र्य आहे. तथापि, तिरंगा फडकवताना काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, कारण १९७१ च्या Prevention Of Insults To National Honour Act कायद्यांतर्गत काही नियम आहेत जे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजेत.
तिरंगा फडकवण्याचे काय नियम आहेत?
- तिरंगा फडकवताना तिरंग्याचा आदर सर्वोतोपरी असला पाहिजे हे ध्यानात ठेवावे. कधीही गलिच्छ किंवा फाटलेला झेंडा फडकवू नका.
- तिरंगा कधीही उलटा फडकवू नये. जेव्हा तुम्ही तिरंगा फडकावता तेव्हा वरच्या बाजूला भगवा रंग दिसला पाहिजे. ध्वज कुणापुढे झुकता कामा नये. तसेच तिरंग्याभोवती इतर कोणताही ध्वज त्याच्यापेक्षा उंच नसावा किंवा त्याच्या बरोबरीचा असू नये. तिरंग्याच्या खांबावर इतर काहीही ठेवू नका. यामध्ये फुलांच्या हार आणि चिन्हाचा समावेश आहे.
- तिरंगा फडकवताना तो जमिनीवर किंवा पाण्यात नसावा. तिरंग्याचा वापर ड्रेस म्हणून करू नये. तुम्ही तुमच्या रुमाल, उशी किंवा अशा कोणत्याही वस्तूवर तिरंगा वापरू शकत नाही. तसेच तिरंग्यावर काहीही लिहिता येणार नाही.