हर हर महादेव... शिवलिंगाच्या दुग्धाभिषेकाऐवजी चिमुकल्यांना पाजले दूध
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 03:45 PM2019-03-04T15:45:13+5:302019-03-04T15:56:23+5:30
देशभर महाशिवरात्री एकादशीनिमित्त भाविकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. त्यातच, देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी राज्यात असलेल्या तीन ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणीही मोठी गर्दी झाली आहे.
देशभरात महाशिवरात्री एकादशीचा उत्साह दिसून येत आहे. देशातील 12 ज्योतिर्लिंग तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. तर गावा-गावातील शिवमंदिरेही सजली आहेत. तेथेही भक्तांनी मोठी गर्दी करत शिवलिंगाच्या दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. त्यातच, महादेवाच्या पिंडीवर दुग्धाभिषेक होत आहे. मात्र, सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. तो फोटो पाहून महादेवाला खऱ्या अर्थानं अभिषेक घातल्याच्या भावना या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिल्या जात आहेत.
एका शिवमंदिरात भाविक भक्ताने महादेवाच्या पिंडीवर दूधाचा अभिषेक न करता, चक्क दूध पिशव्या ठेवल्या आहेत. विशेष म्हणजे, काही वेळातच या दूध पिशव्या पिंडीवरुन बाजूला हटवत त्या पिशव्यातील दूध मंदिराजवळ असलेल्या चिमुकल्यांना प्यायला दिले आहे. सोशल मीडियावरही आज महाशिवरात्रीचा उत्साह दिसून येत आहे. तर ट्विटरवर महाशिवरात्री या हॅशटॅगने जोर धरला आहेत. त्यातच, ट्विटर आणि फेसबुकवर महादेवाच्या पिंडीवर ठेवण्यात आलेल्या दूध पिशव्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत. तर, दुसऱ्या फोटोमध्ये लहान मुलांना त्याच पिशवीतील दूध प्यायला दिल्याचे दिसत आहे. या लहान चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद पाहून, खरंच आज महादेवालाही अत्यानंद झाला असेल, अशा भावना नेटीझन्सकडून या फोटोवर व्यक्त करण्यात येत आहेत. दरम्यान, अनेकांकडून दरवर्षी शिवलिंगावर दूध न वाहण्याचे, शिवलिंगाला दुग्धाभिषेक न करण्याचे आवाहन करण्यात येते. मात्र, यंदा प्रत्यक्षात या दोन महिलांना कृतीतून जगाला संदेश दिला आहे.
देशभर महाशिवरात्री एकादशीनिमित्त भाविकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. त्यातच, देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी राज्यात असलेल्या तीन ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणीही मोठी गर्दी झाली आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर, औरंगाबादेतील घृष्णेश्वर आणि पुण्यातील भिमांशकर ही तीन तिर्थक्षेत्र हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहेत. तसेच परळी वैजिनाथ आणि औंढ नागनाथ यांनाही महत्त्वाची ज्योतिर्लिंग मानण्यात येते. महाशिवरात्री एकादशीनिमित्त सर्वच भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. पुण्यातील भिमाशंकर, नाशिकमधील त्र्यंबकेश्वर, परळीचे वैजिनाथ, परभणीचे औंढ नागनाथ आणि औरंगाबाद येथील घृष्णेश्वर मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त यात्राही भरल्या जातात. महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेण्यासाठी आणि अभिषेक करण्यासाठी भक्तांच्या रांगा लागल्या आहेत.