हडप्पा संस्कृती ५५०० वर्षे जुनी नसून ८००० वर्षे जुनी
By Admin | Published: May 29, 2016 05:21 PM2016-05-29T17:21:20+5:302016-05-29T17:21:20+5:30
आयआयटी-खड़गपुर मधील शास्त्रज्ञ आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण यांनी मिळून केलेल्या संशोधनात सिंधू संस्कृती म्हणजेच हडप्पा संस्कृती ही ५५०० वर्षे जुनी नसून कमीत कमी ८००० वर्षे जुनी
>ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. २९ : आयआयटी-खड़गपुर मधील शास्त्रज्ञ आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण यांनी मिळून केलेल्या संशोधनात सिंधू संस्कृती म्हणजेच हडप्पा संस्कृती ही ५५०० वर्षे जुनी नसून कमीत कमी ८००० वर्षे जुनी असल्याचे पुरावे मिळाले आहेत. म्हणजेच हडप्पा संस्कृती ही इजिप्त (इ.स.पूर्व ७००० ते इ.स.पूर्व ३०००) आणि मेसोपोटेमिया (इ.स.पूर्व ६५०० ते इ.स.पूर्व ३१००) या जगातील सर्वात जुन्या असलेल्या संस्कृतींच्या आधीच्या कालखंडात अस्तित्त्वात होती. याबरोबरच शास्त्रज्ञांना हडप्पा संस्कृतीच्याही पूर्वी सुमारे एक हजार वर्षे अस्तिवात असलेल्या संस्कृतीचे पुरावे मिळाले आहेत.
हे संशोधन प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या नेचर जर्नल मध्ये २५ मे रोजी समाविष्टकरण्यात आले आहे. यामुळे जगात विविध मानवी संस्कृतींचा उदय आणि त्यांचा कार्यकाळ याबाबत नव्याने विचार करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले जात आहे. हवामानात होणारे बदल आणि क्रमाक्रमाने कमी होत जाणारा पाऊस यामुळे ही संस्कृती सुमारे ३००० वर्षांपूर्वी लोप पावली असावी असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. हडप्पा संस्कृती ही पाकिस्तानातील मोहेंजोदाडो आणि हडप्पा तर भारतातील लोथल, धोलावीरा आणि काली बंगा या पलीकडे देखील वाढली होती आणि हरियाणा मधील भिर्दाना आणि राखीगाढी या आतील भागांपर्यंत परसली होती हे सिद्ध करण्यासाठी हे संशोधन करण्यात आले होते. यात शास्त्रज्ञांना प्राण्यांच्या हाडांचे तसेच दातांचे अवशेष मिळाले आहेत.
दुष्काळसदृश्य स्थितीतही हडप्पा संस्कृती वाढली
हडप्पा संस्कृतीच्या शेवटचा कालखंड हा मोठ्या प्रमाणावर स्थलांतर, लोकसंख्येतील घट, हिंसा आणि हडप्पा कालीन लिपीचा अस्त अशा अनेकसामाजिक बदलांचा साक्षीदार होता असे एका शास्त्रज्ञाने सांगितले. संशोधनातील निरीक्षणानुसार पाऊस कमी हा सात हजार वर्षापासून होत गेला पण संकृती लोप पावली नाही. या कालखंडातील लोक हे बदलत्या हवामानाशी जुळवून घेणारे होते. त्यांनी हवामांतील बदलांनुसार पिकं घेण्याच्या पद्धतीत बदल देखील केले होते. पिक टंचाईशी कसा सामना करायचा हे हडप्पा संस्कृतीतील सापडलेले पिकांच्या साठवणीचे सुसंघटित तंत्राचे पुरावे दाखवून देतात. तसेच यावरून त्याकाळातील पिक प्रक्रिया ही अधिक वैयक्तिक व घरगुती आधारित पीक प्रक्रिया होती असे दिसून येते. हे बदलत्या हवामानाबरोबरच स्थलांतर होण्याचे आणि परिणामी संस्कृती नामशेष होण्याचे प्रमुख कारण असावे असे शास्त्रज्ञांचे मत आहे.