छळाचे आरोप गंभीर, मात्र अटकेने हेतू साध्य होईल?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 05:56 AM2023-07-22T05:56:28+5:302023-07-22T05:56:59+5:30
ब्रिजभूषण प्रकरणी दिल्ली कोर्टाचे आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे (डब्ल्यूएफआय) मावळते अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप गंभीर आहेत, परंतु त्यांना या टप्प्यावर ताब्यात घेऊन कोणताही हेतू साध्य होणार नाही, असे दिल्ली न्यायालयाने शुक्रवारी जारी केलेल्या आदेशात नमूद केले आहे.
अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी हरजित सिंग जसपाल यांनी म्हटले की, माझ्या मते, जामीन अर्ज विचारात घेताना आरोपांचे गांभीर्य हा एक महत्त्वाचा विचार आहे यात शंका नाही, परंतु, केवळ त्याच घटकावर निर्णय घेता येणार नाही. जेव्हा खटला चालू असलेल्या कैद्यांना अनिश्चित काळासाठी तुरुंगात ठेवले जाते तेव्हा कलम २१चे उल्लंघन केले जाते.
...तर ७ वर्षे तुरुंगवास
न्यायालयाने नमूद केले की सिंग आणि तोमर यांना विनयभंग/लैंगिक अत्याचाराच्या आरोपाचा सामना करावा लागतो, ज्यात जास्तीत जास्त सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे. तपासादरम्यान आरोपींना अटक करण्यात आली नसून पोलिसांच्या अहवालानुसार त्यांनी तपासात सहकार्य केल्याचे न्यायाधीशांनी सांगितले.