घर आहे की छळछावणी? कुटुंबातच होतोय महिलांचा छळ; उत्तर प्रदेश सर्वाधिक असुरक्षित
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 11:01 AM2023-01-10T11:01:49+5:302023-01-10T11:02:08+5:30
अत्याचार पुन्हा वाढले : वर्षभरात ६,९०० प्रकरणे
नवी दिल्ली : महिला घरातच सुरक्षित असल्याचे मानले जात होते; पण ताजी आकडेवारी काहीतरी वेगळेच सांगते. महिलांचा छळ होण्याचे सर्वाधिक ठिकाण हे घरच असल्याचे आणि कुटुंबातच मोठा छळ होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे.
देशात महिलांवरील कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये दरवर्षी मोठी वाढ झाली असून, २०२२ मध्ये राष्ट्रीय महिला आयोगाने ६,९०० प्रकरणे नोंदविली आहेत.
वाढत्या गुन्ह्यांमुळे महिला आयोगाची चिंता वाढली आहे. २०२० मध्ये महिलांविरुद्धच्या अत्याचाराच्या एकूण तक्रारींची संख्या सुमारे २३,७०० होती. मात्र केवळ एकाच वर्षात म्हणजे २०२१ मध्ये त्यात ३० टक्क्यांनी वाढ होत ही संख्या ३०,८०० पेक्षा जास्त झाली. २०२२ मध्ये घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये किंचित वाढ झाली.
तक्रारी का वाढल्या?
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा म्हणाल्या की, तक्रारींची संख्या २०१४ नंतर आता सर्वाधिक आहे. २०१४ मध्ये ३३,९०६ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तक्रारींच्या संख्येत वाढ होण्याचे कारण म्हणजे जनसुनावणी आणि २४ तास चालणाऱ्या हेल्पलाइनमुळे महिलांना मदत मिळत आहे.
रोखण्यासाठी काय गरजेचे?
- अत्याचाराबाबत पुढे येऊन बोला
- महिला आयोगाकडे ॲानलाइन तक्रार करा
- कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी जनजागृती
- रूढीवादी विचारांना विरोध
- पितृसत्ताक मानसिकता बदलण्याची गरज