हरभजन कौरची 51 वर्षांनी कराचीमध्ये मुलांशी भेट

By admin | Published: February 13, 2017 01:27 PM2017-02-13T13:27:38+5:302017-02-13T13:37:52+5:30

अमृतसरच्या हरभजन कौर यांची करुण कहाणी ऐकल्यास 'बजरंगी भाईजान' आणि 'गदर' सिनेमांहून तुम्हाला अधिक दुःख होईल.

Harbhajan Kaur visits children in Karachi after 51 years | हरभजन कौरची 51 वर्षांनी कराचीमध्ये मुलांशी भेट

हरभजन कौरची 51 वर्षांनी कराचीमध्ये मुलांशी भेट

Next

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. 13 - अमृतसरच्या हरभजन कौर यांची करुण कहाणी ऐकल्यास 'बजरंगी भाईजान' आणि 'गदर' सिनेमांहून तुम्हाला अधिक दुःख होईल. कौर यांच्या आयुष्यात चक्रीवादळ आलं आणि त्यात सर्व काही उद्ध्वस्त झालं. भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीमुळे त्यांच्या आयुष्यालाच कलाटणी मिळाली. अमृतसरच्या राजासांसी येथे राहणारी हरभजन कौर 1946मध्ये लग्नानंतर लाहौरमध्ये स्थायिक झाली. मात्र त्यानंतर 1947ला भारताच्या विभाजनादरम्यान कौर आणि त्यांच्या सासरकडचे लोक लाहौर सोडण्यासाठी निघाले असतानाच रस्त्यात झालेल्या दंगलीत त्यांचे पती आणि सासरकडच्या मंडळींची हत्या करण्यात आली. त्यानंतर हरभजन कौरला कराचीतल्या अफजल खान नामक व्यक्तीनं वाचवलं.

अफजल यांनी त्यांना भारतात पाठवण्याचे खूप प्रयत्न केले. मात्र ते अयशस्वी ठरले. अशा परिस्थितीत हरभजन कौर यांचे धर्मपरिवर्तन करून अफझल यांनी त्यांच्याशी निकाह केला. निकाहनंतर हरभजन कौरला शहनाज बेगम नाव देण्यात आलं. वेळेचं चक्र सुरूच राहिलं आणि हरभजन कौरला अफजलपासून 6 अपत्य झाली. मात्र त्यानंतर हरभजन कौरला भारतात जाण्याची संधी मिळाली. 1962च्या भारत-पाक व्हिजा नीतींतर्गत हरभजन अमृतसरमधल्या राजासांसी या वडिलांच्या गावी पोहोचली. मुलीला समोर पाहून आई-वडिलांनीही सुटकेचा निःश्वास सोडला. त्यानंतर त्यांनी हरभजन कौरला पाकिस्तानात परत पाठवलं नाही. स्वतःच्या कुटुंबीयांमध्ये हरभजन अडकून पडली. मात्र पाकिस्तानातील स्वतःच्या सहा मुलांची आठवण तिला कायम सतावत राहिली. सहा अपत्यांमधील एकाच्या मृत्यूची बातमी तिच्या कानावर पडली आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली. हरभजन कौरची परिस्थिती पाहून आईवडिलांनी तिचं अमृतसरमधल्याच एक गुरबचन सिंह नामक व्यक्तीशी लग्न लावून दिलं. परिस्थितीपुढे हरभजन कौरही हतबल झाली. गुरबचन सिंह यांच्या पत्नीचं निधन झालं होते. तसेच त्यांना रोमी नावाचा एक मुलगा होता.

रोमी मोठा झाल्यावर हरभजन कौर यांनी त्याला स्वतःची हकीकत सांगितली. आईचं दुःख पाहून रोमीनं हरभजन कौरची पाकिस्तानातील मुलांशी भेट घडवून आणण्याचा निर्धार केला. 1989मध्ये रोमी अमेरिकेला गेला. त्यानंतर तो कॅनडामध्ये स्थायिक झाला. 2007मध्ये वडील गुरबचन यांच्या निधनानंतर त्यानं आईला स्वतःकडे आणलं. आई आणि मुलांची भेट घडवून आणण्यासाठी पाकिस्तानमधल्या ऊर्दू समाचार या वृत्तपत्रात रोमीनं जाहिरात दिली. ही जाहिरात हरभजन कौरची मोठी मुलगी खुर्शीदनं पाहिली आणि तिने रोमीशी संपर्क साधला. त्यानंतर खुर्शीद कॅनडात पोहोचली.

खुर्शीदला पाहून 86 वर्षीय हरभजन कौरला अश्रू अनावर झाले. कॅनडाची राष्ट्रीयत असल्यानं हरभजन कौरला पाकिस्तानचा व्हिजा मिळाला. 7 फेब्रुवारी 2017ला हरभजन कौर कराचीत दाखल झाली. कराचीत हरभजन कौरला पाच मुलांच्या मोठ्या कुटुंबाची भेट झाली. 51 वर्षांनंतर 86 वर्षीय हरभजन कौरची इच्छा पूर्ण झाली. हरभजन कौरच्या मुलांची लग्न झाली होती. तसेच ती आजीदेखील झाली होती. कुटुंबात सर्व मिळून 42 नातू-नाती, सुना असा परिवार आहे. हरभजन कौरचा 9 एप्रिलपर्यंत व्हिजा वैध आहे. त्यानंतर तिला पाकिस्तानमधून परत जावं लागणार आहे.

Web Title: Harbhajan Kaur visits children in Karachi after 51 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.