दहशतवाद्यांना आश्रय; भारताने कॅनडाला चांगलेच सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 05:42 AM2023-12-22T05:42:45+5:302023-12-22T05:42:54+5:30
भारत व कॅनडा यांच्या संबंधातही अचानक बदल झालेले पाहायला मिळाले, अशी दर्पोक्ती कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केली होती.
ओटावा : कॅनडाने भारतविरोधी प्रवृत्तीचे लोक, फुटीरतावादी, दहशतवाद्यांना आश्रय दिला आहे. त्या प्रमुख मुद्द्यावर अद्याप कॅनडाने कोणताही तोडगा काढलेला नाही, अशी नाराजी व्यक्त करत परखड शब्दांत भारताने त्या देशाला पुन्हा सुनावले आहे.
खलिस्तानवादी गुरपतवंतसिंह पन्नू याची हत्या करण्यासाठी भारत सरकारच्या कर्मचाऱ्याने एका व्यक्तीशी संपर्क साधला होता, असा आरोप अमेरिकेने केल्यानंतर भारताचा पवित्रा बदलला. त्यानंतर भारत व कॅनडा यांच्या संबंधातही अचानक बदल झालेले पाहायला मिळाले, अशी दर्पोक्ती कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केली होती. त्यावर भारताने कॅनडाला चोख प्रत्युत्तर दिले.
भारतीय परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले की, कॅनडाने दहशतवादी, भारतविरोधी प्रवृत्तींना आश्रय देऊ नये, अशी भारताची ठाम भूमिका आहे. या मुख्य मुद्द्याबद्दल कॅनडाने बोलण्याची गरज आहे. ट्रुडो यांनी केलेल्या वक्तव्यावर बागची यांनी त्यांचे नाव न घेता ही प्रतिक्रिया व्यक्त केली.