आंध्र प्रदेशात रॅगिंगप्रकरणी ५४ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर कडक कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2017 02:21 PM2017-09-19T14:21:08+5:302017-09-19T14:29:17+5:30
आंध्र प्रदेशच्या राजीव गांधी माहिती आणि तंत्रज्ञान विद्यापीठातील ५४ विद्यार्थ्यांवर रॅगिंग केल्याप्रकरणी व्यवस्थापनाकडून कडक कारवाई करण्यात आली आहे.
हैदराबाद, दि. 19- आंध्र प्रदेशच्या राजीव गांधी माहिती आणि तंत्रज्ञान विद्यापीठातील ५४ विद्यार्थ्यांवर रॅगिंग केल्याप्रकरणी व्यवस्थापनाकडून कडक कारवाई करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात विद्यापीठात शिकणाऱ्या काही सिनिअर विद्यार्थ्यांनी ज्युनिअर विद्यार्थ्यांचं रॅगिंग केल्याचा प्रकार घडला होता. या सर्व विद्यार्थ्यांवर सोमवारी विद्यापीठ प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली. राज्यातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
२९ ऑगस्ट रोजी विद्यापाठीतील सिनिअर विद्यार्थ्यांनी १२ ज्युनिअर विद्यार्थ्यांना एका रूममध्ये नेऊन त्यांना शिक्षा दिली होती. यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले होते. काही विद्यार्थ्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागंल. त्यानंतर पीडित विद्यार्थ्यांनी या सगळ्याविरोधात तक्रार विद्यापीठ व्यवस्थापनाकडे केली होती. या प्रकरणी विद्यापीठाच्या एका समितीकडून चौकशी झाल्यावर 54 विद्यार्थी दोषी आढळले होते. चौकशी समितीने दोषी विद्यार्थांना निलंबित करण्याची सूचना केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचं विद्यापीठाच्या व्यवस्थापनाने सांगितलं. निलंबित करण्यात आलेले विद्यार्थी विद्यापीठात सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या आणि चौथ्या वर्षात शिकत आहेत, अशी माहिती समोर आली आहे.
दोषी विद्यार्थ्यांपैकी सहा विद्यार्थांना वर्षभरासाठी वर्गात हजेरी लावता येणार नाही. त्याचबरोबर त्यांना वार्षिक परीक्षाही देता येणार नाही. इतर नऊ विद्यार्थांना एका वर्षासाठी महाविद्यालयातून निलंबित करण्यात आलं आहे. पण, त्यांना वार्षिक परीक्षा देता येणार आहे. तसंच इतर १३ विद्यार्थ्यांवर नोव्हेंबरपर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर उरलेल्या २४ विद्यार्थ्यांना विद्यापीठातून काढून टाकण्यात आलं असल्याचं विद्यापीठाचे रजिस्ट्रार व्ही. व्यंकट दास यांनी सांगितलं.
देशात २००९ मध्ये रॅगिंगविरोधी कायदा लागू करण्यात आला होता. त्याचबरोबर रॅगिंगसंबंधी कुठलीही तक्रार आणि मदतीसाठी सरकारने यंत्रणा उभारली होती. तरीही रॅगिंगचे प्रकार थांबले नाहीत.