80 टक्के प्रवासी क्षमतेसह देशांतर्गत उड्डाणांना मंजुरी, हरदीप पुरींनी ट्विट करून दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2020 06:29 PM2020-12-03T18:29:32+5:302020-12-03T18:32:54+5:30
कोविड-१९ विषाणूचा संसर्ग पुन्हा वाढत असल्याने नागरी विमानसेवा महासंचालक (डीजीसीए)ने आंतरराष्ट्रीय विमानसेवा ३१ डिसेंबरपर्यंत स्थगित केली आहे.
नवी दिल्ली - नागरी उड्डण मंत्रालयाने देशांतर्गत उड्डाणांसाठी प्रवाशांची क्षमता वाढवून आता 80 टक्के करण्याचा निर्मय घेतला आहे. नागरी उड्डाणमंत्री हरदीप पुरी यांनी ही घोषणा केली. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे, की ''25 मेरोजी 30 हजार प्रवाशांसह देशांतर्गत उड्डाणांना सुरुवात करण्यात आली. हे प्रमाण वाढून आता 2.52 लाखांवर पोहोचले आहे. आता सरकार देशांतर्गत उड्डाणांसाठी 80 टक्के प्रवासी क्षमतेची परवानगी देत आहे.''
Domestic operations recommenced with 30K passengers on 25 May & have now touched a high of 2.52 lakhs on 30 Nov 2020. @MoCA_GoI is now allowing domestic carriers to increase their operations from existing 70% to 80% of pre-COVID approved capacity.@PMOIndia@DGCAIndia
— Hardeep Singh Puri (@HardeepSPuri) December 3, 2020
आंतरराष्ट्रीय उड्डाणे 31 डिसेंबरपर्यंत बंद -
कोविड-१९ विषाणूचा संसर्ग पुन्हा वाढत असल्याने नागरी विमानसेवा महासंचालक (डीजीसीए)ने आंतरराष्ट्रीय विमानसेवा ३१ डिसेंबरपर्यंत स्थगित केली आहे. यासंदर्भात डीजीसीएने पत्रकही काढले होते. भारतात कोरोनाच्या विषाणूने शिरकाव केल्यानंतर २३ मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा स्थगित करण्यात आली आहे. अनलॉकनंतरही यावरील स्थगिती उठविली नव्हती. युरोपमध्ये दुसरी लाट आली आहे. त्यामुळे ३१ डिसेंबरपर्यंत स्थगिती कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अपवादात्मक परिस्थितीत काही ठरावीक मार्गांवर निवडक उड्डाणांना परवानगी देण्यात येऊ शकते, असेही डीजीसीएने स्पष्ट केले आहे.
कार्गासेवा, वंदे भारत मोहिमेला वगळले -
या निर्बंधातून कार्गासेवा, वंदे भारत मोहीम आणि विशेष विमानांना वगळण्यात आले आहे. भारताने अमेरिका आणि इंग्लंडसह २० देशांसोबत ‘एअर बबल’ करार केला आहे. याअंतर्गत जुलै महिन्यापासून विशेष उड्डाणे सुरू करण्यात आली आहेत, तर देशांतर्गत विमानसेवेला २५ मेपासून परवानगी देण्यात आली आहे.