हार्दिक पटेलला अटक व सुटका, पोलिसांचा लाठीमार.....
By Admin | Published: August 25, 2015 08:59 PM2015-08-25T20:59:29+5:302015-08-25T22:23:50+5:30
गुजरातमधील पटेल समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण द्यावे म्हणून आंदोलनाचे नेतृत्त्व करणाऱ्या २२ वर्षीय हार्दिक पटेलला अहमदाबाद पोलिसांनी अटक केले आणि काहीवेळानंतर
ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. २५ - गुजरातमधील पटेल समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण द्यावे म्हणून आंदोलनाचे नेतृत्त्व करणाऱ्या २२ वर्षीय हार्दिक पटेलला अहमदाबाद पोलिसांनी अटक केले आणि काहीवेळानंतर त्याची सुटका केली.
पटेल समाजाला ओबीसीमध्ये सहभागी करून आरक्षण द्यावे यासाठी महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीसाठी सायंकाळी पाच वाजेपर्यंतच परवानगी देण्यात असल्याचे सांगत पोलिसांनी हार्दिक पटेलला अटक केली. या महारॅलीत लाखो लोक सहभागी झाले होते. या महारॅलीत काही ठिकाणी हिंसक वळण आल्याने जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. तसेच अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. जमावाकडून अनेक गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे.
दुसरीकडे बिहारचे मुख्यमंत्री आणि मोदींचे विरोधक नितीश कुमार यांनी हार्दिक पटेलच्या आंदोलनास पाठिंबा दिला आहे.
गुजरातमध्ये पटेल समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी जोर धरत असून २२ वर्षीय हार्दिक पटेल या समाजाचे नेतृत्व करत आहे. अहमदाबाद येथे पटेल समाजाच्या आरक्षणासाठी महारॅलीचे आयोजन करुन हार्दिक पटेलने गुजरातमधील भाजपा सरकारला इशाराच दिला आहे. गेल्या १० वर्षात गुजरातमध्ये सहा हजार शेतक-यांनी आत्महत्या केली आता आत्महत्या झाली तर त्याचे परिणाम भोगावे लागतील असेही पटेल यांनी म्हटले आहे. देशातील तरुण आंदोलनाच्या माध्यमातून हक्क मागत असेल व त्याला त्याचे हक्क मिळत नसतील तर त्यातूनच नक्षलवाद जन्माला येतो असेही पटेल यांनी नमूद केले. गुजरातमध्ये पटेल समाजाचे वर्चस्व असून गुजरातमध्ये गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच भाजपाविरोधात एवढे मोठे आंदोलन होत आहे.