हार्दिक पटेल काँग्रेसच्या बाजूने, भाजपाला विरोध कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 04:51 AM2017-11-23T04:51:37+5:302017-11-23T04:52:16+5:30
अहमदाबाद : पाटीदार समुदायाला विशेष प्रवर्गात आरक्षण देण्याची मागणी काँग्रेसने मान्य केल्याने पाटीदार आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा घोषित केला आहे.
अहमदाबाद : पाटीदार समुदायाला विशेष प्रवर्गात आरक्षण देण्याची मागणी काँग्रेसने मान्य केल्याने पाटीदार आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा घोषित केला आहे. काँग्रेसने पाटीदार समुदायासाठी दिलेला आरक्षणाचा फॉर्म्युला एस.सी., एस.टी. आणि ओबीसी प्रवर्गासाठीच्या ५० टक्के आरक्षण कोट्याव्यतिरिक्त असेल, असे हार्दिक पटेल यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केलेल्या ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादेवर ते म्हणाले की, ही सर्वोच्च न्यायालयची केवळ सूचना आहे. काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास पाटीदार समुदायाला आरक्षण देण्यासाठी काँग्रेसचे सरकार सर्वेक्षण करील. त्यानुसार विधानसभेत एक विधेयक मांडून आरक्षण दिले जाईल.
विधानसभा निवडणुकीतील जागावाटपांबाबत काँग्रेसशी कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही कोणत्याही जागेची मागणी केलेली नाही. तथापि, पाटीदार समुदायाच्या उमेदवारांना उभे करावे, असे आम्ही काँग्रेसला सांगितले आहे.
पाटीदार अनामत आंदोलन समितीच्या (पास) काही सदस्यांनी निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारी दाखल केली आहे? त्यांचे काय? असे विचारले असता हार्दिक पटेल म्हणाले की, ते आता आमच्या संघटनेचे सदस्य नसतील. ‘पास’च्या सदस्यांना ५० लाख रुपयांचे आमिष दाखवून भाजपने त्यांना विकत घेण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही हार्दिक यांनी केली.
>आरक्षणाचा फॉर्म्युला नेमका कसा आहे?
पाटीदार समुदायाला विशेष प्रवर्गातहत किती टक्के आरक्षण दिले जाईल, याचा निर्णय सरकारनियुक्त आयोगाच्या सर्वेक्षणानंतरच केला जाईल. फॉर्म्युल्यानुसार अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) आणि इतर मागासवर्ग (ओबीसी) घटकांच्या ४९ टक्के आरक्षणाला हात न लावता काँग्रेसने आरक्षणाचा आजवर लाभ न मिळालेल्या समुदायांना (राज्यघटनेतील परिच्छेद ३१ सी आणि ४६ तहत) आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती हार्दिक पटेल यांनी दिली.
>आरक्षण मर्यादेचा उल्लेख नाहीच
५० टक्क्यांव्यतिरिक्त आरक्षणाची मर्यादा वाढविण्याच्या दृष्टीने कृती करण्यास सर्वोच्च न्यायालायने राजस्थान सरकारला मनाई केली होती. यावर हार्दिक पटेल म्हणाले की, ही (५० टक्के आरक्षणाची मर्यादा) सर्वोच्च न्यायालयाची सूचना आहे. भारतीय राज्यघटनेत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेसंदर्भात कोणताही उल्लेख नाही. तेव्हा माझ्या मते ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देता येऊ शकते.
>गुजरातेत माझा लढा भाजपाविरुद्ध आहे. त्यामुळे आमचा निवडणुकीत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे काँग्रेसला पाठिंबा असेल. कारण काँग्रेसने आमची आरक्षणाची मागणी मान्य केली आहे. निवडणूक जाहीरनाम्यातही आमच्या मागण्यांचा समावेश करण्याचा शब्द काँग्रसेने आम्हाला दिला आहे.
- हार्दिक पटेल