मोटेरा स्टेडियमला नरेंद्र मोदींचं नाव दिल्यानं हार्दिक पटेलनं व्यक्त केला संताप
By महेश गलांडे | Published: February 24, 2021 05:07 PM2021-02-24T17:07:42+5:302021-02-24T17:08:37+5:30
अहमदाबादमधील यापूर्वी मोटेरा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्टेडियमचे आता नामांतर करण्यात आले असून, या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (Narendra Modi) नाव देण्यात आले आहे.
अहमदाबाद - जगातील सर्वात मोठं स्टेडियम असा लौकिक मिळवणाऱ्या या स्टेडियमचे औपचारिक उदघाटन आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते झाले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, क्रीडामंत्री किरेन रिजिजू आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह उपस्थित होते. या स्टेडियममध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामना आजपासून खेळवण्यात येणार आहे. (India vs England 3rd Test Live Score ) मात्र, स्टेडियमच्या नावावरुन विरोधकांनी मोदी सरकारला लक्ष्य करण्यास सुरुवात केलीय.
अहमदाबादमधील यापूर्वी मोटेरा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्टेडियमचे आता नामांतर करण्यात आले असून, या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (Narendra Modi) नाव देण्यात आले आहे. त्यामुळे आता मोटेरा स्टेडियम नरेंद्र मोदी स्टेडियम या नावाने ओळखले जाणार आहे. या नामांतरावरुन काँग्रेसने मोदी सरकारवर टीका केलीय. गुजरातमधील पाटीदार समाजाचे आणि काँग्रेसचे नेते हार्दीक पटेल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून मोटेरा स्टेडियमच्या नावाला विरोध दर्शवला आहे. तसेच, भाजपा सरकारचा हा निर्णय संतापजनक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलय.
भारत रत्न, लोह पुरुष सरदार पटेल ने आरएसएस पर प्रतिबंध लगाया था और उसी कारण आरएसएस के चेले सरदार पटेल का नाम मिटाने का हर संभव प्रयास कर हैं। बाहर से मित्रता पर भीतर से बैर, यह व्यवहार भाजपा का सरदार पटेल से हैं। एक बात याद रखिएगा की सरदार पटेल का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान। 😡
— Hardik Patel (@HardikPatel_) February 24, 2021
जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमच नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम ठेवण्यात आलंय. हा सरदार पटेल यांचा अपमान नाही का?. सरदार पटेल यांच्या नावाने मत मागणारी भाजपा, आता सरदार साहेबांचा अपमान करत आहे. गुजरातची जनता सरदार पटेल यांचा अपमान सहन करणार नाही, असे म्हणत हार्दीक पटेल यांनी संताप व्यक्त केलाय.
दुनिया के सबसे बड़े अहमदाबाद स्थित सरदार पटेल क्रिकेट स्टेडियम का नाम बदलकर नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम रखा गया है, क्या यह सरदार पटेल का अपमान नहीं हैं ? सरदार पटेल के नाम पर मत माँगने वाली भाजपा अब सरदार साहब का अपमान कर रही हैं। गुजरात की जनता सरदार पटेल का अपमान नहीं सहेगी।
— Hardik Patel (@HardikPatel_) February 24, 2021
सज्जनसिंह वर्मा यांनीही केली टीका
सरदार वल्लभाई पटेल यांच्या नावावर मत मागणाऱ्या भाजपाकडून हा सरदार पटेल यांचा अवमान आहे. अहमदाबाद येथील सरदार पटेल स्टेडियमचे नाव बदलून नरेद्र मोदी स्टेडियम असे ठेवणे म्हणजे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा घोर अपमान आहे, हे लज्जास्पद आहे, असे ट्विट मध्य प्रदेशमधील काँग्रेस नेते आणि देवासचे आमदार सज्जनसिंह वर्मा यांनी केलंय. वर्मा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाला आक्षेप घेतला आहे.
स्टेडियमचं वैशिष्ट
हे स्टेडियम सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट्स एन्क्लेव्हचा भाग आहे. मोटेराच्या नवनिर्मित स्टेडियममध्ये खेळाडूंसाठी तब्बल चार ड्रेसिंग रूम आहेत. याशिवाय एलईडी लाईट्सचा वापर करण्यात आल्याने चेंडूवर नजर स्थिरावणे खेळाडूंना सोपे जाणार आहे. रात्रीच्यावेळी देखील खेळाडू हवेत आणि आकाशात चेंडू सहजपणे पाहू शकतील. जगातील सर्वांत मोठ्या स्टेडियममध्ये तब्बल ११ मध्यवर्ती खेळपट्ट्या आहेत. शिवाय जिमसह चार ड्रेसिंग रूम्स आहेत. मोटेरा स्टेडियमच्या पुनर्बांधणीचे काम सध्या बीसीसीआय सचिव असलेले जय शाह हे राज्य संघटनेचे अध्यक्ष असताना सुरू झाले. या स्टेडियममध्ये एक लाख दहा हजार प्रेक्षक सहज बसून सामन्याचा आनंद घेऊ शकतात.
दरम्यान, मेलबोर्न क्रिकेट स्टेडियमच्या तुलनेत ही संख्या अधिक आहे. जीसीए स्टेडियममध्ये होणाऱ्या पुढील दोन सामन्यांसाठी जवळपास ५५ हजार तिकिटांची विक्री करण्यात आली आहे.